PMC Election 2026: पुण्यात ३०४१ जणांना नगरसेवक व्हायचंय; १६५ जागांसाठी तब्बल ३०४१ उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 10:31 IST2025-12-31T10:31:26+5:302025-12-31T10:31:26+5:30
Pune Mahanagar Palika Election 2026: पुणे महापालिकेच्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी रॅली आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. १५ क्षेत्रीय कार्यालय उमेदवारांच्या समर्थकांच्या गर्दीने फुलून गेले होते.

PMC Election 2026: पुण्यात ३०४१ जणांना नगरसेवक व्हायचंय; १६५ जागांसाठी तब्बल ३०४१ उमेदवारी अर्ज दाखल
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी सर्वच क्षेत्रीय कार्यालयामध्ये इच्छुकांनी गर्दी केली होती. मंगळवारी विविध राजकीय पक्षाच्या २ हजार २९८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुुळे पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी ३ हजार ०४१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची ही आकडेवारी आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत जे निवडणूक कार्यालयाच्या आतमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले, त्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे उमेदवारी अर्जाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक १५ डिसेंबर रोजी जाहीर झाली असून, ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३ वाजेपर्यंत जे उमेदवार कार्यालयाच्या आतमध्ये आले, त्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे काम उशिरापर्यत सुरू होते. दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी आणि उद्धवसेना व काँग्रेसची आघाडी सोमवारी झाली. पण, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे भाजपने उर्वरित उमेदवारांना आणि शिंदेसेनेने इच्छुकांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि उद्धवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती.
दरम्यान, पुणे महापालिकेने इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे एकूण ४१ खात्यांना जोडून, उमेदवारांचा अर्ज एकावेळी सर्व खात्यांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी लिंक केले होते. हे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाइन प्रणालीद्वारे एकूण ४०५७ अर्ज प्राप्त झाले. एकूण प्राप्त अर्जापैकी २७४ अर्ज खात्याच्या शिफारशीनुसार बाद करण्यात येऊन ३७८३ अर्जदारांना ऑनलाइन ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले.
अर्जांची आज होणार छाननी, अर्ज माघारी २ जानेवारीला
पुणे महापालिकेेच्या निवडणुकीसाठी ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करून वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर राजकीय चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे. येत्या ३ जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हे दिली जाणार आहेत.
रॅली, शक्तिप्रदर्शन
पुणे महापालिकेच्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी रॅली आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. १५ क्षेत्रीय कार्यालय उमेदवारांच्या समर्थकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
क्षेत्रीय कार्यालय : उमेदवारी अर्ज : दाखल संख्या
येरवडा कळस धानोरी कार्यालय – १८२
नगर रोड - वडगाव शेरी कार्यालय – १४१
कोथरूड बावधन कार्यालय – १७४
औंध बाणेर कार्यालय - ११०
शिवाजीनगर घोले रोड कार्यालय – १४८
ढोले पाटील रोड कार्यालय – १२२
हडपसर मुंढवा कार्यालय – २१३
वानवडी रामटेकडी कार्यालय – ८०
बिबवेवाडी कार्यालय – १६२
भवानी पेठ कार्यालय – २२४
कसबा विश्रामबाग वाडा कार्यालय – १६०
वारजे कर्वेनगर कार्यालय – १७१
सिंहगड रोड कार्यालय – १३४
धनकवडी सहकारनगर कार्यालय – १८३
कोंढवा येवलेवाडी कार्यालय – १०४
एकूण - २२९८