PMC Election Results 2026: गणेश बिडकर की श्रीनाथ भिमाले; पुण्याच्या महापौरपदी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:07 IST2026-01-19T13:06:42+5:302026-01-19T13:07:23+5:30
पुणे महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौरपदाचे नाव निश्चित होणार आहे

PMC Election Results 2026: गणेश बिडकर की श्रीनाथ भिमाले; पुण्याच्या महापौरपदी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे महापौर भाजपचा होणार आहे. पण, महापौरपदाचीआरक्षण सोडत अद्याप काढण्यात आलेली नाही. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतरच महापौरापदाचे नाव निश्चित होणार आहे. २२ जानेवारीला संपूर्ण राज्यात महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ११९ जागा मिळवून भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. पण, महापौरपदाची आरक्षण सोडत अद्याप निघालेली नाही. त्यामुळे महापौरपदाची आरक्षण सोडत कधी निघणार, याकडे निवडून आलेल्या सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौरपदाचे नाव निश्चित होणार आहे. पुणे महापालिकेच्या २०१२ आणि २०१७ या निवडणुका झाल्या. त्यावेळी महापौरपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण होते. त्यामुळे अनेकांना महापौर होण्याची संधी मिळाली होती.
ओबीसी पुरुष आरक्षण निघण्याची शक्यता जास्त
पुणे महापालिकेत गेली अनेक वर्षे महापौरपदासाठी एससी महिला आणि ओबीसी पुरुषाचे आरक्षण निघालेले नाही. २२ जानेवारीला संपूर्ण राज्यात नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महापालिकांच्या महापौरपदाची सोडत काढली जाणार आहे. त्यात ओबीसी पुरुष आरक्षण निघण्याची शक्यता जास्त आहे. ओबीसी पुरुष आरक्षण निघाल्यानंतर माजी सभागृह नेते गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले दोघांपैकी एकाची महापौरपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.