PMC Election Results 2026: पुण्यात राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसला अनपेक्षित यश; अवघ्या ९ जागांवरून थेट १६ जागांपर्यंत मारली मजल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 15:24 IST2026-01-17T15:23:41+5:302026-01-17T15:24:57+5:30

PMC Election Results 2026 मोठ्या सभा, स्टार प्रचारकांचा झगमगाट किंवा आक्रमक प्रचार यांचा अभाव असतानाही मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांवर विश्वास दाखवला

PMC Election Results 2026 Congress gets unexpected success compared to NCP in Pune; Goes from just 9 seats to 16 seats | PMC Election Results 2026: पुण्यात राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसला अनपेक्षित यश; अवघ्या ९ जागांवरून थेट १६ जागांपर्यंत मारली मजल

PMC Election Results 2026: पुण्यात राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसला अनपेक्षित यश; अवघ्या ९ जागांवरून थेट १६ जागांपर्यंत मारली मजल

पुणे : काँग्रेसला यंदाच्या महापालिका निवडणुकीत मिळालेले यश हे अनेक अर्थांनी आश्चर्यकारक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. मागील निवडणुकीतील अवघ्या ९ जागांवरून थेट जवळपास दुप्पट म्हणजे १६ जागांपर्यंत मजल मारणे, हे केवळ आकड्यांचे यश नसून पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पुनरुज्जीवनाचे स्पष्ट संकेत देणारे आहे.

वरिष्ठ नेत्यांविना मिळालेले यश

या निवडणुकीतील सर्वांत ठळक बाब म्हणजे प्रचारात काँग्रेसच्या राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय वरिष्ठ नेत्यांची जवळपास पूर्ण अनुपस्थिती. मोठ्या सभा, स्टार प्रचारकांचा झगमगाट किंवा आक्रमक प्रचार यांचा अभाव असतानाही मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांवर विश्वास दाखवला. यावरून स्थानिक मुद्दे, उमेदवारांची ओळख आणि कार्यकर्त्यांचे जाळे हे घटक अधिक प्रभावी ठरल्याचे स्पष्ट होते.

उमेदवारांवर विश्वास

काँग्रेसने बहुतांशी ठिकाणी प्रयोग टाळत पारंपरिक, ओळखीच्या आणि स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या उमेदवारांनाच संधी दिली. या उमेदवारांचा मतदारांशी थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांवरील भूमिका आणि सामाजिक संबंध याचा फायदा पक्षाला झाला. ‘ब्रँड नेम’पेक्षा ‘ओळखीचा चेहरा’ महत्त्वाचा ठरतो, हे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

आघाडीतील मर्यादा आणि त्याचा परिणाम

महाविकास आघाडीतील घटक असलेल्या उद्धवसेनेची अपेक्षित साथ अनेक प्रभागांत मिळाली नाही. काही ठिकाणी थेट तर काही ठिकाणी अप्रत्यक्ष स्पर्धा दिसून आली. तरीही काँग्रेसने आपली स्वतंत्र ताकद दाखवली. हे यश आघाडीच्या छायेत न राहता मिळाल्यामुळे पक्षाच्या आत्मविश्वासात भर घालणारे ठरते.

राष्ट्रवादीची साथ नसतानाही वाढ

राजकीय जाणकारांच्या मते, जर राष्ट्रवादी काँग्रेसची संघटित साथ मिळाली असती, तर काँग्रेसच्या जागांची संख्या आणखी वाढू शकली असती. राष्ट्रवादीची पारंपरिक मतपेढी आणि काँग्रेसचा कोअर मतदार एकत्र आल्यास अनेक ठिकाणी भाजपविरोधी मते विभागली जाणे टाळता आले असते. ही बाब भविष्यातील आघाडीच्या गणितांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण

या निवडणुकीत काही प्रभागांत भाजपविरोधी मतदारांनी काँग्रेसला पर्याय म्हणून स्वीकारल्याचे चित्र दिसते. सत्ताधारी पक्षाविरोधातील नाराजी थेट काँग्रेसकडे वळली, हे पक्षासाठी सकारात्मक संकेत आहेत. मात्र, ही नाराजी टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी आवश्यक ठरणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा जोर लावला, वरिष्ठ नेत्यांचे दौरे, व्यापक प्रचार, संघटनात्मक ताकद आणि संसाधनांचा वापर करूनही पक्षाला केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले. अपेक्षेपेक्षा कमी मिळालेल्या या जागांनी राष्ट्रवादीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विशेषतः ज्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीने आक्रमक प्रचार केला, तेथेही अपेक्षित यश न मिळणे हे पक्षासाठी आत्मपरीक्षणाची गरज दर्शवणारे ठरले आहे. त्या तुलनेत काँग्रेसने मर्यादित साधनसंपत्ती, वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती आणि आघाडीतील अपुऱ्या समन्वयाच्या परिस्थितीतही तुलनेने चांगल्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जागा मिळवल्या. संख्येच्या दृष्टीने राष्ट्रवादी पुढे असली, तरी काँग्रेसने जिंकलेल्या अनेक जागा या थेट लढतीतील, प्रतिष्ठेच्या आणि प्रभावी प्रभागांमधील असल्याने त्याचे राजकीय वजन अधिक असल्याचे मानले जात आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर नेतृत्वकेंद्रित राहिला, तर काँग्रेसचा भर स्थानिक उमेदवार, स्थानिक प्रश्न आणि थेट मतदारसंवादावर होता. याच फरकाचा परिणाम निकालात स्पष्टपणे दिसून आला. ‘जोरदार प्रचार’ आणि ‘प्रत्यक्ष मतांत रूपांतर’ यामधील दरी राष्ट्रवादीसाठी अडचणीची ठरली, तर काँग्रेससाठी हीच बाब जमेची ठरली.

काँग्रेसच्या यशात स्थानिक पातळीवरील संघटना आणि उमेदवारांची निवड योग्य ठरली तर मोठ्या नेत्यांविनाही यश शक्य आहे. दुसरे म्हणजे, आघाडीतील समन्वय आणि जागावाटप योग्य पद्धतीने झाले तर या यशाचे प्रमाण आणखी वाढवता येऊ शकते. मात्र, या यशाचे रूपांतर दीर्घकालीन राजकीय बळात करायचे असेल, तर संघटन बळकटी, आघाडीतील स्पष्टता आणि जनतेशी सातत्यपूर्ण संवाद या बाबींवर पक्षाला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

Web Title : पुणे पीएमसी चुनाव में कांग्रेस की अप्रत्याशित जीत; राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से आगे

Web Summary : पुणे पीएमसी चुनाव में कांग्रेस ने अप्रत्याशित रूप से जीत हासिल की, वरिष्ठ नेताओं की उपस्थिति के बिना भी 9 से 16 सीटें बढ़ाईं। स्थानीय उम्मीदवारों और मुद्दों ने मतदाताओं को आकर्षित किया, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से बेहतर प्रदर्शन किया। यह जमीनी स्तर के संबंधों और रणनीतिक उम्मीदवार चयन के महत्व को दर्शाता है।

Web Title : Unexpected Congress Victory in Pune PMC Election; Gains Over Nationalist Congress Party

Web Summary : Congress surprised in Pune's PMC election, jumping from 9 to 16 seats despite lacking senior leaders' presence. Local candidates and issues resonated with voters, outperforming Nationalist Congress Party. This highlights the importance of grassroots connections and strategic candidate selection for electoral success.