PMC Election 2026: शिवसेनेला कमी लेखणाऱ्यांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:04 IST2026-01-09T17:03:07+5:302026-01-09T17:04:20+5:30
PMC Election 2026 नगरपरिषदेमध्ये काही लोकं म्हणाले की, शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे. पण आम्ही दाखवले शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत आहे

PMC Election 2026: शिवसेनेला कमी लेखणाऱ्यांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही - एकनाथ शिंदे
पुणे : पुण्यात शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाली असून मनसे उद्धवसेनेची युती झाली आहे. या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षप्रमुखांकडून जोरदार प्रचार सभाही घेतल्या जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांची आज कात्रज येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभाही संपन्न झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. शिवसेनेला कमी लेखणाऱ्या विरोधकांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
शिंदे म्हणाले, आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन या निवडणुकीत उतरले आहोत. विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये. शिवसेना एक मजबूत पक्ष आहे. नगरपरिषदेमध्ये काही लोकं म्हणाले की, शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे. पण आम्ही दाखवले शिवसेना चांदा ते बांदा पर्यंत आहे. आणि जे आता विरोधक आहेत. जे आमच्या विरोधामध्ये काही मोठी मोठी भाष्य करत आहेत. शिवसेनेला कमी लेखत आहेत. पण मी आपल्याला एवढंच सांगतो की, शिवसेनेला बोलणाऱ्या विरोधकांना देखील कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
आपला अजेंडा विकास आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणे आहे. अनेक कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या आहेत. चांदणी चौकात खूप ट्राफीक होत असते. मी इथून जाताना लोकांनी मला थांबवून या व्यथा सांगितल्या होत्या. मी तातडीने सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आता तिकडचं ट्राफिक दूर झालं आहे. कात्रजच ट्राफिक दूर करणार आहोत. विधानसभेच्या पहिल्या भाषणात सांगितलं होत, कि आम्ही २०० पार करणार तेव्हा २३२ आणले. शेवटी सर्व काही जनतेच्या हातात आहे. एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरु केली. अनेकांनी त्याला विरोध केला. पण तुमचा एकनाथ खमक्या भाऊ बसला होता. त्यामुळे ती सुरु झाली. कोणी माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. एक बार मैने कमिटमेंट कर दि तो मैं अप ने आप कि भी नाही सुनता असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले.