PMC Election 2026: जनता सुज्ञ आहे, ते मतदानातून उत्तर देतील; लांडगेंच्या टीकेवर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:39 IST2026-01-10T15:37:44+5:302026-01-10T15:39:42+5:30
PMC Election 2026 पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही विकास करण्यासाठी आलो आहोत, त्यामुळे असल्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही

PMC Election 2026: जनता सुज्ञ आहे, ते मतदानातून उत्तर देतील; लांडगेंच्या टीकेवर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया
पिंपरी: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार बैठका आणि सभा सुरु आहेत. त्यांनी पिंपरीत अनेक ठिकाणी सभेत भाषण करताना भाजपच्या कारभारावर सवाल उपस्थित केले आहेत. तसेच आधीच्या कारभारी आणि सत्तेवर टीका केली आहे. त्यावरून महेश लांडगे आणि अजित पवारांमध्ये थेट शाब्दिक सामना सुरु झाला आहे. अजितदादांनी आमदारांवर टीका केली. तर त्याला लांडगे यांनी प्रत्युत्तर दिले. महेश लांडगे यांनी एकेरी उल्लेख करत अजित पवारांवर टीका केली होती. आज त्यावर भाष्य करत अजित पवारांनी मिश्किल टिपण्णी केली. आता निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उतरल्या आहेत. त्यांनी आज सकाळपासून पिंपरीत बैठकांचा धडाका लावला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुनेत्रा यांना महेश लांडगे यांच्या टीकेबाबत विचारले असता त्यांनी सुज्ञ जनता त्यांना उत्तर देईल असे सांगितले.
पवार म्हणाल्या, आम्ही पिंपरी चिंचवड शहराला नवचैतन्य देण्यासाठी आलो आहोत. विकासासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. मागील काही वर्षात ते झाले नाही. ते आता आम्ही आघाडीच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. त्यासाठी मी पिंपरी चिंचवडमध्ये आल्याचे त्यांनी सांगितले. महेश लांडगे यांच्या टीकेबाबत विचारले असता त्यांनी जनता सुज्ञ आहे. तेच मतदानातून उत्तर देतील. आम्ही विकासासाठी आल्याने अशा गोष्टींकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा फायदा होईल का? असे विचारले असता पवार म्हणाल्या, महाराष्ट्रात सगळीकडं हे सुरु आहे. आत युती किंवा आघाडी झाली याचा मलाही आनंद झाला आहे. विकासासाठी अजितदादांनी हा निर्णय घेतला आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल.
अजित पवारांचा पुण्यात जाहीरनामा
पुण्यासाठी पाणी, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता या सर्व मुद्द्यांवर ठोस काम करण्याची माझी तयारी आहे. हा जाहीरनामा कागदापुरता मर्यादित राहणार नाही असा ठाम विश्वास अजित पवारांनी दिला आहे. पुण्यात पाण्याच्या समस्येसाठी यापूर्वी २ हजार ८१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले, मात्र अद्याप अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवण्यात आलेल्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पाण्याच्या ३३ मिसिंग लिंक एकत्रित करून पुण्याची पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम केली जाईल, असे आश्वासन त्यांनी पुण्यात दिले.