PMC Election 2026: महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी साडेपाचनंतर थंडावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 10:05 IST2026-01-13T10:01:59+5:302026-01-13T10:05:53+5:30
PMC Election 2026 मतदानाचा प्रचार करण्यासाठी एक दिवसच राहिल्याने सकाळपासूनच उमेदवार प्रभागमध्ये पदयात्रा, प्रचारफेऱ्या काढून प्रचार सुरु केला आहे

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी साडेपाचनंतर थंडावणार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रचार करण्याची मुदत मंगळवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाच वाजता संपणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावणार आहेत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी ४८ तास प्रचार संपतो. मतदानाचा प्रचार करण्यासाठी एक दिवसच राहिल्याने सकाळपासूनच उमेदवारांनी प्रभागमध्ये पदयात्रा, प्रचारफेऱ्या काढून प्रचार सुरु केला आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी समर्थकांसह रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. जाहीर प्रचाराचा शेवटच्या दिवस असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्षांचे उमेदवार जिवाचे रान करणार आहेत. महापालिका निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी दुपारी १ वाजता गोखलेनगर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकाळी रोड शो होणार आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारी विविध प्रभागांमध्ये जाऊन प्रचार रॅलीत सहभागी होणार आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यामध्ये आरेाप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. त्यामुळे प्रचारात रंगत आली आहे.