PMC Election 2026: 'मोदीजींना सांगा की, तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा', चंद्रकांत पाटलांनी सांगितली आजीबाईंची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:09 IST2026-01-15T10:08:46+5:302026-01-15T10:09:59+5:30
PMC Election 2026 जरा मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा, आम्हाला ते सोपं पडेल, आजीबाईंची आठवण पाटलांनी सांगितली

PMC Election 2026: 'मोदीजींना सांगा की, तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा', चंद्रकांत पाटलांनी सांगितली आजीबाईंची आठवण
पुणे : पुणे महापालिकेचा रणसंग्राम अखेर अंतिम टप्प्यात आला असून सकाळी ७:३० पासून मतदानाला सुरुवात झाली. त्यामधून पुण्याचे कारभारी ठरणार आहेत. ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी १ हजार १५३ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी ९३२ ठिकाणी ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत. त्यात ९०६ संंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप सर्व जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच एका आजीबाईंची आठवण सांगितली.
पाटील म्हणाले, २०१४ साली मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत या सगळ्या प्रचाराचा आरोप प्रत्यारोपाचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम व्हायचा. २०१४ मोदीजी पंतप्रधान आणि देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि ५ वर्षांमध्ये आता विकासावर आणि चेहऱ्यावर मोदीजी आहेत. विकास सुरु असल्यामुळे आरोपांचा काही उपयोग होत नाही. मला परवा प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये एका आजीबाईंना भेटलो त्या म्हणाल्या, जरा मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा. आम्हाला ते सोपं पडेल. इतका मोदीजींचा करिष्मा असल्याचे पाटलांनी यावेळी सांगितले आहे.
आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हण यांनी पुण्यातील सर्व जागांचा आढावा घेतला आहे. निवडणुकीमध्ये २०१७ नंतर आता आठ वर्षांनी निवडणूक होत आहे. आधीपेक्षा आणि यावेळी जरा जास्त जोर लावावा लागला. अजित दादा म्हणतायेत की, मला कुणाला सोबत घेण्याची गरज भासणार नाही. महापौर आमचा होणार आहे. असे दादांसारखे जे राज्यातले नेते आहेत. त्यांचा हा ओव्हर कॉन्फिडन्स वाटत आहे. २०१४ ते २०२६ आम्ही सातत्याने तीनदा मोदीजी पंतप्रधान झाले. देवेंद्रजी यांना उद्धवजी यांनी दगा फटका केला. नाहीतर सलग मुख्यमंत्री आले असते.
दरम्यान आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे. पुणे पालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढवत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. काँग्रेस व उद्धवसेना - मनसे हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत.