PMC Election 2026: पुण्यात शिंदेसेना स्वबळावर १२५ जागा लढवणार; युतीपेक्षा जास्त जागा निवडून येतील, शिवसैनिकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:29 IST2026-01-01T12:27:55+5:302026-01-01T12:29:27+5:30
PMC Election 2026 शिंदेसेनेने भाजपकडे ३५ जागेची मागणी केली होती. पण, प्रत्यक्षात १५ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली. पण, सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे शिंदेसेेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला

PMC Election 2026: पुण्यात शिंदेसेना स्वबळावर १२५ जागा लढवणार; युतीपेक्षा जास्त जागा निवडून येतील, शिवसैनिकांचा दावा
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना युतीमध्ये केवळ १५ जागा शिंदेसेनला मिळाल्या होत्या. सन्मानजनक जागा न मिळाल्याने भाजपबरोबरची युती तुटली आहे. शिंदेसेना स्वबळावर १२५ जागा लढवत आहे. त्यामुळे स्वबळाचा निर्णय शिंदेसेनेला तारणार का अस सा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्यात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीचे सरकार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना याची युती होणार असे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केेले होते. शिंदेसेनेने भाजपकडे ३५ जागेची मागणी केली होती. पण, प्रत्यक्षात १५ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली. पण, सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे शिंदेसेेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १२५ जागांवर शिंदेसेनेने उमेदवार दिले. युतीमध्ये कमी जागा वाट्याला आल्यामुळे शिंदेसेनेच्या निवडून येणाऱ्यांची संख्या कमी राहिली असती. आता स्वबळावर लढत असल्यामुळे युतीपेक्षा जास्त जागा शिंदेसेनेच्या निवडून येतील असा दावा शिवसैनिक करत आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालानंतरच हे कळणार आहे.
भाजपची डोकेदुखी वाढली
शिंदेसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये प्रबळ उमेदवार उभे केले आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विश्वासातील काही उमेदवारांना भाजपच्या उमेदवारांसमोर उभे करण्यात आले आहे. त्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार नाही, असे सांगितले जात आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्याविरोधात धंगेकर यांनी चिरंजीव प्रणव धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत धंगेकर यांनी बीडकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे) पक्षाच्या युतीच्या जागा वाटपाच्या चर्चेपासून धंगेकर यांना दूर ठेवण्यात आले. त्याचे उट्टे काढण्यासाठी गणेश बिडकर यांच्या विरोधात प्रणव धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.