PMC Election 2026: पुण्यातील कारभाऱ्यांनी शहराची वाट लावली; अजित पवारांची भाजपच्या कामकाजावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:31 IST2026-01-05T11:31:21+5:302026-01-05T11:31:32+5:30
PMC Election 2026 महापालिकेच्या निमित्ताने पुण्यातल्या काही मूठभर लोकांच्या डोक्यामध्ये सत्ता गेली आहे, ती आपल्याला बाहेर काढायची आहे

PMC Election 2026: पुण्यातील कारभाऱ्यांनी शहराची वाट लावली; अजित पवारांची भाजपच्या कामकाजावर टीका
बाणेर : पुण्यामध्ये चार-पाच वर्षांमध्ये ११३० कोटी रुपये निधी दिला. परंतु त्या निधीचा योग्य पद्धतीने उपयोग झाला नाही. महापालिकेने फक्त ६५८ कोटी खर्च केले. १३८४ किलोमीटरपैकी फक्त ४२५ किलोमीटर रस्ते पूर्ण झाले. याला जबाबदार कोण? केंद्र सरकार चांगले काम करत आहे. राज्य सरकारही चांगले काम करत आहे. मात्र पुण्यातील कारभाऱ्यांनी या शहराची वाट लावली. यासाठी येत्या निवडणुकीत पुणे शहराचा कारभार आमच्या हातात द्या, असे म्हणत भाजपच्या कामकाजावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडकून टीका केली.
पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (बाणेर - बालेवाडी - पाषाण - सुस - म्हाळुंगे - सुतारवाडी - सोमेश्वरवाडी) राष्ट्रवादी (अजित पवार) चे अधिकृत उमेदवार बाबूराव चांदेरे, अमोल बालवडकर, पार्वती निम्हण, गायत्री मेढे-कोकाटे यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभा बाणेर येथे रविवारी (दि. ४) सायंकाळी पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब सुतार, राहुल बालवडकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, समीर चांदेरे, प्रकाश तात्या बालवडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले की, जगातील पाचशे शहरांचा अभ्यास केला. ट्रॅफिकची अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्या मध्ये पुण्याचा चौथा क्रमांक लागतो. ही अवस्था शहराची करण्यात आली. गेल्या आठ वर्षांमध्ये ७३ हजार कोटी रुपये पालिकेने खर्च केले, परंतु कोणतीही कामे दिसत नाहीत. पुणेकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. टँकर सुरू आहेत. नागरी वस्तीत दुर्गंधी पसरली आहे. अर्बन सिटीच्या नावाखाली कामे काढली जातात. अनेक जणांनी हफ्तेखोरी सुरू केली आहे. आमच्या कार्यकाळात कधीही ट्रॅफिक तुंबले नाही. इथे टेंडरमध्ये फुगवटा केला जातो. मी पुरावा दाखवतो, जे रस्ते झाले. दुसरीकडे कमी पैशांत रस्ते होतात, मी कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत नाही. अनेकांची करोडो रुपयांची प्रॉपर्टी वाढली. याआधी देखील केंद्रात, राज्यात आमची सत्ता होती. आम्ही कधी मस्ती केली नाही, आज सत्तेचा माज सुरू आहे.
महापालिकेच्या निमित्ताने पुण्यातल्या काही मूठभर लोकांच्या डोक्यामध्ये सत्ता गेली आहे, ती आपल्याला बाहेर काढायची आहे. त्याकरता आपल्याला बदल करायचा आहे. अजित पवार कामाचा माणूस आहे, तो काम करणार आहे. तो दिलेला शब्द पाळणारा आहे. पुण्यातील कोयता गँग मला नष्ट करायची आहे. मी कुणालाच वाऱ्यावर सोडणार नाही. पुढील पाच वर्षांकरिता महापालिका सुरक्षित लोकांच्या हाती देण्याची ही निवडणूक आहे. विरोधकांच्या भूलथापांना कृपा करून बळी पडू नका. ज्यांनी काम केलंय त्यांनाच तुम्ही साथ द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले.