PMC Election 2026: ना झेंडा, ना चिन्ह; अपक्ष उमेदवारांचा सप्तरंगी शाही फेटा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:53 IST2026-01-08T09:57:48+5:302026-01-08T13:53:43+5:30
या अपक्ष उमेदवारांमध्ये उठून दिसण्यासाठी आणि सर्व पक्षीय मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी आता प्रचारात नव्या संकल्पनांचा वापर होत असून, त्यातीलच एक लक्षवेधी प्रयोग म्हणजे ‘सप्तरंगी शाही फेटा’.

PMC Election 2026: ना झेंडा, ना चिन्ह; अपक्ष उमेदवारांचा सप्तरंगी शाही फेटा चर्चेत
पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी चढाओढ पाहायला मिळाली. मात्र, पक्षीय तिकीट न मिळाल्यानंतरही माघार न घेता अपक्ष उमेदवारांनी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. या अपक्ष उमेदवारांमध्ये उठून दिसण्यासाठी आणि सर्व पक्षीय मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी आता प्रचारात नव्या संकल्पनांचा वापर होत असून, त्यातीलच एक लक्षवेधी प्रयोग म्हणजे ‘सप्तरंगी शाही फेटा’.
राजकीय पक्षांची चिन्हे, रंग आणि ओळखी यापलीकडे जाऊन ‘सर्वांना आपलेसे’ करणारा हा सप्तरंगी फेटा खास संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. सातही रंग एकमेकांत सुरेखपणे मिसळलेले असून, सर्व पक्षांतील कार्यकर्ते आणि मतदार आकर्षित करणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
विशेष म्हणजे, हा फेटा पूर्णपणे लाईटवेट आहे. अनेक तास डोक्यावर घालावा लागणाऱ्या प्रचाराच्या दगदगीचा विचार करून तो हलका आणि आरामदायी बनवण्यात आला आहे. डोक्यावर कम्फर्ट मिळण्यासह यात एअर व्हेंटिलेशनही आहे. सातही रंग एकमेकांत स्मुथ पद्धतीने मर्ज होऊन तयार झालेला हा फेटा सध्या प्रचारात चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांकडे आर्थिक ताकद, मोठी यंत्रणा नसली तरी कल्पकता आणि नवोपक्रमाच्या जोरावर ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. एक फेट्याचा खर्च सात ते आठ हजारांपर्यंत जात आहे.
अपक्ष उमेदवाराला सप्तरंगी शाही फेटा हवा होता. दोन दिवस मेहनत घेऊन हलका, आरामदायी आणि राजबिंडा फेटा तयार केला. दीर्घकाळ घालता येईल, असा कम्फर्ट आणि आकर्षकपणा जपला आहे. - गिरीष मुरुडकर, मुरुडकर झेंडे फेटेवाले