PMC Election 2026: पुण्यात आघाडीमधील नव्या पॅटर्नचा मनसेलाही फायदा होईल; पदाधिकाऱ्यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 10:44 IST2025-12-31T10:43:33+5:302025-12-31T10:44:31+5:30
PMC Election 2026 भाजपला धोबीपछाड करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकवटले असले तरी उद्धवसेना आणि मनसे दोघांच्या देखील ही अस्तित्वाची लढाई असल्याचे बोलले जात आहे

PMC Election 2026: पुण्यात आघाडीमधील नव्या पॅटर्नचा मनसेलाही फायदा होईल; पदाधिकाऱ्यांचा विश्वास
पुणे : सध्या पुण्यात एका नवीन पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे काँग्रेस, उद्धवसेना आणि अप्रत्यक्षपणे का होईना सहभागी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील आघाडीची. मुंबई पालिकेनंतर पुण्यात उद्धवसेना आणि मनसे यांच्यात युती होणार का? महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश होणार का? याकडे उद्धवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. सुरुवातीला काँग्रेसचा मनसेला बरोबर घेण्यात काहीसा विरोध होता. मात्र, आघाडीची गणिते बिनसली. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर मनसेचा आघाडीत आडून का होईना प्रवेश झाला. मुंबईप्रमाणे पुण्यातही उद्धवसेना आणि मनसे यांची युती झाल्याने जागावाटपाचे समीकरणही काहीसे बदलले.
आघाडीच्या १६५ जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला १००, तर शिवसेनेला ६५ जागा आल्या आहेत. शिवसेनेच्या वाट्याच्या ६५ जागांपैकी २१ जागा मनसेला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मनसेने ३२ जागा उद्धवसेनेकडे मागितल्या आहेत. तो तिढा अद्याप तरी सुटलेला नाही. त्यामुळेच मंगळवारी (दि. ३०) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने काँग्रेससह उद्धवसेना आणि मनसेने अधिक जागांवर अर्ज भरल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, भाजपला धोबीपछाड करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकवटले असले तरी उद्धवसेना आणि मनसे दोघांच्या देखील ही अस्तित्वाची लढाई असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीतील मनसेच्या कामगिरीचा विचार केला तर २०१२ मध्ये पुणे महापालिकेत मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते; परंतु २०१७ च्या निवडणुकीत मनसेला केवळ २ जागा प्राप्त झाल्या, म्हणजे २८ वरून एकदम दोनच नगरसेवक अशी मनसेची अवस्था पाहायला मिळाली. आता हे चित्र बदलविण्यासाठी मनसे पुन्हा एकदा उद्धवसेनेशी युती करून निवडणूक रिंगणात उतरली आहे. आघाडीमधील या नव्या पॅटर्नमुळे मतांचे विभाजन होऊन मनसेलाही फायदा होईल, असा विश्वास मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आहे. आता हा विश्वास मतदार सार्थ ठरवणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.