PMC Election 2026: अनेक मोठी पदे भूषविणारे नेते दबावतंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेले - बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:06 IST2026-01-12T13:04:02+5:302026-01-12T13:06:20+5:30
PMC Election 2026 भाजपमध्ये काँग्रेसची विचारधारा असलेले अनेक चेहरे दिसत असून, काँग्रेसयुक्त भाजप तयार झाली आहे

PMC Election 2026: अनेक मोठी पदे भूषविणारे नेते दबावतंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेले - बाळासाहेब थोरात
पुणे : महापालिका निवडणुकीत भाजपकडून दमबाजी सुरू आहे. राज्यात बिनविरोध निवडून आलेले सर्व नगरसेवक हे लालूच, दम देऊन बिनविरोध निवडून आले आहेत. याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. प्रत्येक निवडणुका या निकोप होणे आवश्यक आहे. परंतु भाजपने सर्व नियम मोडीत काढून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकला आहे, असे स्पष्ट मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने उपस्थित होते. बाळासाहेब थोरात म्हणाले, तिजोरी ही जनतेच्या पैशातून तयार होते. सत्तेवर जाणाऱ्यांनी त्या पैशाची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे. विकासाच्या नावाखाली होणारा खर्च हा पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण, आरोग्य यासाठी व्हावा, कोणाच्या लांगूलचालनासाठी नव्हे. प्रचारात काँग्रेस आघाडीवर दिसली नाही, तरी काँग्रेस ही लोकांच्या मनात रुजलेली आहे. निवडणुका जर निकोप, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात झाल्या, तर काँग्रेसला निश्चितच यश मिळेल. अनेक मोठी पदे भूषविणारे नेते विविध आमिषे आणि दबावतंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेले. त्यामुळे आज भाजपमध्ये काँग्रेसची विचारधारा असलेले अनेक चेहरे दिसत असून, काँग्रेसयुक्त भाजप तयार झाली आहे.
काँग्रेस हे तरंगणारे जहाज
काँग्रेस हे बुडणारे जहाज नसून आत्मविश्वासाने पाण्यावर तरंगणारे जहाज आहे. सध्या पदे कमी असली तरी पक्षाची ताकद कायम आहे. पुणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक नसून महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे, हे दाखविणारी निवडणूक आहे. राज्याच्या जडणघडणीत पुण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. निवडणूक आयोगाकडून वारंवार वेळापत्रक बदलणे, नियमांमध्ये अचानक बदल, उमेदवारांना अपील करण्यास अडथळे, अर्ज माघारीसाठी दहशत व दबावतंत्र, बिनविरोध निवडणुका या बाबी गंभीर असून, त्याची चौकशी झाली पाहिजे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.