PMC Election 2026: पुण्यातील निष्ठावंतांना डावलणे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार; बंडखोरांच्या मनधरणीला यश मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:38 IST2026-01-01T10:37:14+5:302026-01-01T10:38:17+5:30
PMC Election 2026 मोठ्या प्रमाणावर मतं मिळवून निवडून आलेल्या माजी नगरसेवकांनी अपक्ष फॉर्म भरल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे

PMC Election 2026: पुण्यातील निष्ठावंतांना डावलणे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार; बंडखोरांच्या मनधरणीला यश मिळणार का?
हिरा सरवदे
पुणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील नेत्यांना आणि नेत्यांच्या मुलांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिल्याने अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आले आहे. डावलण्यात आलेल्यांपैकी काहींनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. तर काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. पक्षाच्या या धोरणावर अनेक जुने नेते आणि निष्ठावंतांकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निष्ठावंतांना डावलणे भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.
पुणे शहरात मागील काही वर्षांपासून विविध निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपला झुकते माफ दिले आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धवसेनेसह विविध पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि इच्छुकांनी महापालिका निवडणुकीचा शब्द घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. परिणामी महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या माजी नगरसेवकांसह जवळपास अडीच हजार इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या.
उमेदवारी देताना भाजपने इतर पक्षातून आलेल्यांपैकी केवळ विकास नाना दांगट आणि संगीता ठोसर या दोन इच्छुकांचा पत्ता कट करून उर्वरित जवळपास २५ आयारामांना उमेदवारी देत निष्ठावंतांवर अन्याय केला. दुसरीकडे विसर्जित सभागृहातील ३० ते ४० माजी नगरसेवकांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. यामध्ये सर्वाधिक संख्या महिला माजी नगरसेविकांची आहे. ज्या पुरुष माजी नगरसेवकांचे तिकीट कापले आहे, त्यांच्या पत्नीस संधी देऊन नाराजी दूर करण्यात आली आहे. मात्र, ज्या महिला माजी नगरसेविकांची उमेदवारी कापली आहे, त्यांच्या पतींना संधी न देता तेथे नवीन चेहरे देण्यात आले आहेत.
भाजपने उमेदवारी कट केल्याचे लक्षात येताच काहींनी पक्षाला राम राम करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेतली. काहींनी थेट अपक्ष उमेदवारी दाखल करत आपला रोष व्यक्त केला. तर इतरांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतरही कसलीच हालचाल न करता शांत बसणे पसंद केले. मात्र, भाजपने निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवारी दिल्याने पक्षाच्या जुन्या नेत्यांनी, माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे निष्ठावंतांना डावलणे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. निष्ठावंतांची नाराजी कशी दूर करायची, ज्यांची उमेदवारी कट केली, मात्र ते कुठेही न जाता शांत आहेत, अशांना पक्षाच्या प्रचारात कसे अॅक्टिव्ह करायचे आणि बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्यांचे मन कसे वळवायचे, अशी आव्हाने भाजपच्या शहरातील नेत्यांपुढे आहेत. या आव्हानांवर नेते कशी मात करतात, हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
प्रा. मेधा कुलकर्णी निष्ठावंतांसोबत
राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुकवर 'कुछ कह गऐ, कुछ सह गऐ, कुछ कहते कहते रहे गऐ' या कवी गुलजार यांच्या कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपण निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी निष्ठावान कार्यकर्ते हा हॅशटॅग वापरला आहे.
बंडखोरी रोखण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न
महापालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी न दिल्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक विकास नाना दांगट यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे, खडकवासल्याचे माजी सरपंच संतोष मते, योगिता गोगावले, ॲड. मोना गद्रे, योगेश बाचल, समीर रुपदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. या सर्वांचे मन वळवण्याचे प्रयत्न शहरातील नेत्यांकडून सुरू असून त्याला कितपत यश येते, हे लवकरच समोर येणार आहे.