PMC Election 2026: 'पाच कामं पक्का वादा, तीन कामं करू जादा', पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त जाहीरनाम्याचे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:37 IST2026-01-10T19:35:34+5:302026-01-10T19:37:15+5:30
PMC Election 2026 'पुणेकरांनी आमच्यावर विश्वास दाखविल्यास ३ वर्षातच दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करू', असा शब्द अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

PMC Election 2026: 'पाच कामं पक्का वादा, तीन कामं करू जादा', पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त जाहीरनाम्याचे प्रकाशन
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) या दोन पक्षांचा आठ कामांची हमी देणारा आणि “पाच कामं पक्का वादा, तीन कामं करू जादा” अशी टॅगलाईन असलेला संयुक्त जाहीरनामा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात ५०० चौरस क्वेअर फूटापर्यंतच्या मिळकती करमुक्तीसह मेट्रो आणि पीएमपीएल बसचा मोफत प्रवास करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, सुनिल टिंगरे, सुभाष जगताप, विशाल तांबे, दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पाश्चात्त्य देशांमधील शहरांच्या धर्तीवर पुण्यातही मेट्रो आणि पीएमपीएल बसचा मोफत प्रवास आणि ५०० चौरस क्वेअर फूटापर्यंतच्या मिळकती करमुक्त या महत्वपूर्ण योजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब, शहर वाहतूक कोंडी मुक्त, खड्डे व प्रदूषण मुक्त, आदर्श शाळा, टॅंकर माफीयांचे उच्चाटन व नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा, चांगल्या आरोग्य योजना, झोपडपट्टी पुनर्वसन व जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचे आश्वासन दिले आहे.
'गुंठेवारीची घरे सन्मानाने नियमित करण्यास प्राधान्य दिले जाईल. शहरात निर्माण होणाऱ्या ९०० एमएलडी पैकी ५०६ एमएलडी मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित पाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने नदीच्या प्रदूषणात भर पडते. त्यामध्ये सुधारणा केली जाईल. नव्या गावांसह वडगाव शेरी, वाघोलीमधील टॅंकर माफियाला आळा घालून पाण्याच्या टाक्या, वितरण व्यवस्था निर्माण केली जाईल, मुळशी धरणातून पुण्याला अतिरिक्त पाणी आणणार आहे.'पुणेकरांनी आमच्यावर विश्वास दाखविल्यास तीन वर्षातच दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करू', असा शब्द अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी पुणेकरांना दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हमीपत्रातील आश्वासने
- मेट्रो आणि पीएमपीएल बसचा मोफत प्रवास
- ५०० चौरस क्वेअर फूटापर्यंतच्या मिळकती करमुक्त
- पाणी पुरवठ्याच्या निश्चित वेळा
- टॅंकरमाफीयांचे १०० टक्के उच्चाटन
- ३३ मिसींग लिंक आणि १५ मुख्य रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करणार
- रस्त्यावरील खड्डे ७२ तासात बुजविणार
- स्वच्छतेला प्राधान्य, कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणार
- हायटेक आरोग्य सुविधा, एमआरआय, सीटी स्कॅन अल्प दरात देणार
- रुग्णालयांमध्ये २८०० खाटा व अत्याधुनिक बर्न वॉर्डची रचना
- ट्रॅफिक, खड्डे व प्रदूषणमुक्त पुणे शहर करण्यावर भर
- झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन व जुन्या घरांचा विकास
- शहरात १५० आदर्श शाळा करणार