PMC Election 2026: विद्यार्थी चळवळीतून थेट निवडणुकीच्या रिंगणात; पुण्यातील २२ वर्षांच्या सई थोपटेला भाजपकडून मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 23:49 IST2026-01-05T18:32:26+5:302026-01-05T23:49:15+5:30
PMC Election 2026 पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ (क) मधून भारतीय जनता पक्षकडून सई थोपटे हिला महानगरपालिकेचं अधिकृत तिकीट देण्यात आलं असून, ती सध्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवार ठरली आहे

PMC Election 2026: विद्यार्थी चळवळीतून थेट निवडणुकीच्या रिंगणात; पुण्यातील २२ वर्षांच्या सई थोपटेला भाजपकडून मोठी संधी
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा तरुण नेतृत्वाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यातच अवघ्या २२ वर्षांच्या सई थोपटे हिच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ (क) मधून भारतीय जनता पक्षकडून सई थोपटे हिला महानगरपालिकेचं अधिकृत तिकीट देण्यात आलं असून, ती सध्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवार ठरली आहे.
कॉलेजच्या वर्गातून थेट प्रचाराच्या मैदानात
सई थोपटे सध्या पुण्यातील नामांकित Symbiosis महाविद्यालयमध्ये बीबीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. रोजच्याप्रमाणे कॉलेजचा वर्ग सुरू असतानाच तिला पक्षाकडून फोन आला आणि उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती मिळाली. अचानक मिळालेल्या या बातमीने सईचा आनंद गगनात मावेनासा झाला. वर्गातील मित्र-मैत्रिणींनी तिचं अभिनंदन केलं आणि त्यानंतर सई थेट आपल्या प्रभागात पोहोचली. विद्यार्थिनी असतानाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा हा क्षण तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला.
विद्यार्थी चळवळीतून घडलेलं नेतृत्व
सई थोपटे गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदशी सक्रियपणे जोडलेली आहे. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून तिने पुण्यात विविध आंदोलनं, सामाजिक उपक्रम, जनजागृती कार्यक्रम आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक सुविधा, करिअरच्या संधी, तरुणांचे हक्क यावर तिने सातत्याने ठाम भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांमध्ये काम करताना मिळालेला अनुभव, संवादकौशल्य आणि संघटन क्षमता यामुळेच तिचं नेतृत्व अधिक ठळकपणे पुढे आलं.
पक्षाचा तरुणांवरचा विश्वास
राजकारणात तरुणांनी पुढे यावं, नवं नेतृत्व उभं राहावं अशी चर्चा नेहमीच होते. मात्र प्रत्यक्षात संधी फार कमी जणांना मिळते. अशा परिस्थितीत अवघ्या २२ वर्षांच्या सई थोपटे हिला महानगरपालिकेची उमेदवारी देणं म्हणजे पक्षाने तरुण नेतृत्वावर दाखवलेला ठाम विश्वास मानला जात आहे. तिची काम करण्याची तळमळ, स्पष्ट विचार, नेतृत्वगुण आणि संघटनात्मक बांधिलकी पाहूनच पक्षाने तिला ही मोठी संधी दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
राजकीय वारसा आणि संघटनात्मक पाठबळ
सई थोपटे हिला राजकारणाचा वारसा लाभलेला आहे. तिचे वडील प्रशांत थोपटे हे मागील अनेक वर्षांपासून भाजपचे सक्रिय पदाधिकारी आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांनी उपाध्यक्ष, सरचिटणीस, विधानसभा निवडणूक संयोजक अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पर्वती, सहकारनगर आणि धनकवडी परिसरात घराघरात पक्ष पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पक्षनिष्ठेची आणि कार्यपद्धतीची दखल घेत पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सई थोपटे हिला पुणे महानगरपालिकेत प्रतिनिधित्वाची संधी दिल्याचं बोललं जात आहे.
पुणेकरांच्या नजरा सईकडे
राज्यभरातील उमेदवारांमध्ये वयाने सर्वात तरुण असलेली सई थोपटे ही वेगळेपण ठळकपणे समोर येत आहे. तरुणाईचा उत्साह, विद्यार्थी चळवळीचा अनुभव आणि मजबूत संघटनात्मक पाठबळ यांच्या जोरावर सई थोपटे निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावत आहे. आता या संधीचं सोनं करत सई थोपटे पुणेकरांचा विश्वास संपादन करू शकते का? महाराष्ट्रातील सर्वात तरुण उमेदवाराला पुणे महानगरपालिकेत विजयी करून पाठवतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यंदाच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत सई थोपटेंची कामगिरी आणि तिचा राजकीय प्रवास नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे.