९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 08:08 IST2026-01-09T08:08:00+5:302026-01-09T08:08:32+5:30
मी पुराव्यांवरच बोलतो, शब्दाचा पक्का आहे, असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पुणे महापालिकेची सत्ता ज्यांच्या हातात होती, ते मागील नऊ वर्षांत ७५ हजार कोटी रुपयांचा खर्च केल्याचे सांगत आहेत. मात्र शहरात ठोस विकासकामे दिसत नाहीत. मग हा निधी गेला कुठे? असा सवाल उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना केला आहे.
भवानीपेठ येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत अजित पवार म्हणाले, की जगातील ५०० शहरांचा अभ्यास करण्यात आला असता वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा जगात चौथा क्रमांक लागला आहे. पुण्याची सत्ता ज्यांच्या हातात दिली, त्यांच्या कामकाजाचे हे प्रतिबिंब असून, ते अपयशी ठरले आहेत.
रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. काही ठिकाणी पिण्याचे पाणीही मिळत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मी तर शब्दाचा पक्का; पुराव्याशिवाय बोलत नाही
सफाईसाठी १२ हजार ३५० सफाई कर्मचारी असल्याचे सांगत त्यापैकी काही जणांना फोन करून चौकशी केली असता, आम्ही पुण्यातच नसल्याचे सांगितले, तर काहींनी सफाईचे काम करत नाही, असे सांगितले. बोगस नावे दाखवून कोट्यवधी रुपये लुटले आहेत. मी पुराव्यांवरच बोलतो, शब्दाचा पक्का आहे, यातून मार्ग काढायचा असेल, तर बदल केल्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.