PMC Election 2026: निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची गर्दी; पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले ६० उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:34 IST2026-01-08T15:31:35+5:302026-01-08T15:34:12+5:30
PMC Election 2026 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकीवर प्रभाव पडू नये, यासाठी पोलीस सतर्क असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे

PMC Election 2026: निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची गर्दी; पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले ६० उमेदवार
पुणे : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणूक लढवण्यासाठी आपल्यावर किती गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मिळवण्यासाठी विशेष शाखेकडे तब्बल २ हजार ६५० जणांनी अर्ज सादर केले होते. यापैकी सुमारे १ हजार ५०० अर्जदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, यातील सुमारे ६० उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, यामुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
गंभीर गुन्हे दाखल असलेले उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवत असोत किंवा नंतर माघार घेतली असली, तरीही निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. शहरात कुख्यात गुंड किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवल्याची बाबही समोर आली आहे. त्यांच्या प्रचाराच्या पद्धती, हालचाली, संपर्क तसेच जमाव जमविण्यावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. सामाजिक शांतता अबाधित राहावी आणि दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या विजयासाठी गजा मारणे सक्रिय झाल्याचे समोर आले असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला निवडणूक काळात शहरात प्रवेशास मनाई आहे. त्यामुळे तो शहरालगतच्या गावांतून कोथरूड मतदारसंघातील मतदारांना फोनद्वारे संपर्क साधून प्रचार करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, गजा मारणे सध्या पोलिसांच्या रडारवर आहे.
दुसरीकडे कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर, बापू नायर तसेच गजानन मारणे यांच्या नातेवाइकांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांत पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकीवर प्रभाव पडू नये, यासाठी पोलिस सतर्क आहे. निवडणूक काळात दहशत, दबाव, बळाचा वापर किंवा आर्थिक प्रलोभनाच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई केली जाईल. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त