PMC Election 2026: वाहतूक कोंडी फोडण्याचा भाजपचा 'मास्टरप्लान' तयार; प्रभाग क्र ९ मधील लहू बालवडकरांचा वचननामा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:08 IST2026-01-12T15:07:48+5:302026-01-12T15:08:51+5:30
PMC Election 2026 लहू बालवडकर यांनी मांडलेला हा वाहतूक आणि रस्तेविकासाचा सविस्तर रोडमॅप केवळ घोषणापुरता न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आधारित असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

PMC Election 2026: वाहतूक कोंडी फोडण्याचा भाजपचा 'मास्टरप्लान' तयार; प्रभाग क्र ९ मधील लहू बालवडकरांचा वचननामा जाहीर
पुणे: पुणे महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत आता प्रचार शिगेला पोहोचलाय, सर्वच पक्षांनी उमेदवारांनी आपला वचननामा जाहीर केलाय, बाणेर, बालेवाडी, पाषाण,सुस–महाळुंगे परिसरातील सर्वात ज्वलंत प्रश्न असलेल्या वाहतूक कोंडीवर भाजपने थेट लक्ष केंद्रित केले आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांनी “विकास कागदावर नव्हे, तर रस्त्यावर दिसला पाहिजे” या भूमिकेतून प्रभागातील वाहतूक आणि रस्ते व्यवस्थेसाठी सविस्तर आराखडा जाहीर केला आहे.
बालवडकर यांच्या मते, प्रभागातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारे वाहनांचे प्रमाण आणि अपूर्ण रस्ते यामुळे वाहतूक कोंडी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. त्यामुळेच निवडणूक जिंकणे नव्हे, तर ही कोंडी प्रत्यक्षात सोडवणे हेच खरे आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दस मे बस’ने सार्वजनिक वाहतुकीला चालना प्रभागात सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी ‘दस मे बस’ योजना राबवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या योजनेत १० किलोमीटरपर्यंत फक्त १० रुपयांत प्रवास करता येणार असल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होईल, प्रदूषण घटेल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा दावा करण्यात आला आहे.
बाणेर–बालेवाडीकरांसाठी भुयारी मार्ग आणि ३० मीटर रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी बाणेर–बालेवाडी भागात बीट वाईज चौक, मर्सिडीज चौक आणि मिटकॉन परिसरात प्री-कास्ट तंत्रज्ञानावर आधारित तीन नवीन भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर ज्युपिटर रुग्णालय ते लक्ष्मी माता मंदिर दरम्यान ३० मीटर रुंदीचा रस्ता, दसरा चौक ते सदानंद रेसिडेन्सी रोडचे अपूर्ण काम पूर्ण करणे, बालेवाडी ते कस्पटे वस्ती ‘मिसिंग लिंक’ वेगाने पूर्ण करणे आणि पुनावळे ते चांदणी चौक सेवा रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा समावेश आराखड्यात आहे.
पार्किंगसाठी नियोजित P1–P2 झोन
रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी प्रभागात नियोजित P1 आणि P2 पार्किंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यालगत असलेल्या अॅमेनिटी स्पेसेसमध्ये पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याने अनधिकृत पार्किंगला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सुस- पाषाण पट्ट्यासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा
सुस खिंडीतील सेवा रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करून एकेरी वाहतूक व्यवस्था, मुख्य रस्ता व सेवा रस्त्यावरील पदपथांचे रुंदीकरण, सुस पुल ते रवीनगरदरम्यान स्मार्ट सिग्नल, सुस रोडवरील अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणि P1–P2 पार्किंग झोन निश्चित करणे, तसेच पाषाण,सुतारवाडी,सोमेश्वरवाडी परिसरात पक्क्या व टिकाऊ रस्त्यांचे जाळे उभारणे हा या विशेष आराखड्याचा भाग आहे.
लहू बालवडकर यांनी मांडलेला हा वाहतूक आणि रस्तेविकासाचा सविस्तर रोडमॅप केवळ घोषणापुरता न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आधारित असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांच्या उमेदवारीभोवती विकासाच्या अपेक्षांचे वातावरण तयार झाले असून, निवडणूक ही केवळ राजकीय नव्हे तर नागरी जीवनाच्या दृष्टीनेही निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.