PMC Election 2026: भाजपने इतर कार्यकर्त्यांना संधी देण्यापेक्षा स्वतःच्या कार्यकर्त्यांना संधी देऊन निवडणूक लढवावी - गुलाबराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:57 IST2026-01-12T12:57:28+5:302026-01-12T12:57:40+5:30
PMC Election 2026 अंबरनाथमध्ये भाजपने प्रवेश दिलेले काँग्रेसचे नगरसेवक असो की अकोटमध्ये एमआयएमबरोबर केलेली अभद्र युती असो जनतेला हे रुचलेले नाही

PMC Election 2026: भाजपने इतर कार्यकर्त्यांना संधी देण्यापेक्षा स्वतःच्या कार्यकर्त्यांना संधी देऊन निवडणूक लढवावी - गुलाबराव पाटील
वारजे : बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वशी कधीच तडजोड केली नाही. आज अंबरनाथमध्ये भाजपने प्रवेश दिलेले काँग्रेसचे नगरसेवक असो की अकोटमध्ये एमआयएमबरोबर केलेली अभद्र युती असो जनतेला हे रुचलेले नाही. त्यामुळे भाजपने इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना संधी देण्यापेक्षा स्वतःच्या कार्यकर्त्यांना संधी देऊन निवडणूक लढवावी. त्यानंतर यश हे आपलेच असते असे मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
पुण्यात प्रभाग क्र. ३० मधील शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जुने शिवसैनिक विलास बराटे, अनिकेत जावळकर, विनोद मोहिते, प्रतीक्षा जावळकर, मानसी गुंड, दीपाली धीवार, आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, नगररचना व शहरी विकाससारखी महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे याचे श्रेय कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये. विलास तुपे यांनी आपल्या भाषणात काश्मीरमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. जावळकर व मोहिते यांनी प्रभागातील समस्येचा ऊहापोह केला. शिवसेना ही सामान्य माणूस ते कार्यकर्ता तयार करण्याची फॅक्टरी आहे. कोणीही आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण, मुलींना मोफत शिक्षण योजना या शिंदे यांच्या योजना असून, काही झाले तरी योजना चालूच राहतील, अशी पुस्ती मंत्री पाटील यांनी जोडली.
दर निवडणुकीच्या आधी डोके वर काढणारा, कर्वेनगरमध्ये अनेक वर्ष भिजत असलेला झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) चा विषय आम्हीच मार्गी लावू. सत्ताधाऱ्यांनी हा विषय आजवर मार्गी का लावला नाही याचा जाब विचारण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.