PMC Election 2026: महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 10:42 IST2026-01-13T10:40:38+5:302026-01-13T10:42:43+5:30
PMC Election 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील व पुण्यातील गुन्हेगारी संपवतील, अशी अपेक्षा होती. आजही कोयता गँग किंवा पुण्यातील गुन्हेगारी संपलेली नाही

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार - सुप्रिया सुळे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यात केलेल्या घोषणेची पूर्तता आम्ही करणार आहोत. त्याचा अतिरिक्त बोजा पुणेकरांवर पडणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील व पुण्यातील गुन्हेगारी संपवतील, अशी अपेक्षा होती. आजही कोयता गँग किंवा पुण्यातील गुन्हेगारी संपलेली नाही. पुण्यासह महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढली आहे, हे मी नव्हे तर केंद्र सरकारचा डेटा सांगतो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त लाल महाल येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "भाजपने लोकसभेला ४०० पारचा नारा दिला होता, जे झाले ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे. त्यामुळे आता भाजपच्या ११० जागा निश्चित आहे, यावर माझा विश्वास नाही. जर त्या जागा फिक्स असतील, तर त्या कशा पद्धतीने फिक्स केल्या आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या किती जागा निवडून येतील मला माहीत नाही. मी नंबरवर विश्वास ठेवत नाही. पण, महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार आहे.
भाऊ, भाऊ-बहीण यापेक्षा देशहित महत्त्वाचे
महाराष्ट्रात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे किंवा आम्ही बहीण-भाऊ एकत्र येण्यापेक्षा आपल्यासमोरील आव्हाने महत्त्वाची आहेत. उद्या ५०० टक्के टेरिफ लागू झाला, तर आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक आव्हाने येतील, चीनसमवेतची धोरणे बदलल्यास एमआयडीसीवर, आपल्या अन्न-वस्त्र निवाऱ्यावर परिणाम होईल. त्यामुळे कौटुंबिक नाते उंबरठ्याच्या आत ठेवून, राज्य व देशाच्या हिताचे काम करणे महत्त्वाचे असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले.