PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज; केंद्रांवर सीसीटीव्ही, पोलिसांचे जादा मन्युष्यबळ तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:43 IST2026-01-14T11:42:27+5:302026-01-14T11:43:48+5:30
PMC Election 2026 पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत, ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग असून प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज; केंद्रांवर सीसीटीव्ही, पोलिसांचे जादा मन्युष्यबळ तैनात
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी १० वाजता निवडणूक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या निवडणुकीसाठी ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत. त्यात ९०६ संंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा, पोलिसांचे जादा मन्युष्यबळ तैनात करून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या निवडणुकीच्या मतदानसाठी २६ हजार कर्मचारी असणार आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५ मधील भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे १७४ मतदान केंद्रे प्रभाग क्र. ९ बाणेर - बालेवाडी-पाषाण येथे, तर प्रभाग क्र. ३९ अप्पर-सुप्पर इंदिरानगरमध्ये सर्वांत कमी म्हणजे ६८ मतदान केंद्रे आहेत. १४ हजार ५०० मतदान यंत्रे (बॅलेट युनिट), तर ५ हजार ५०० कंट्रोल युनिट आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये महिला मतदान केंद्रे आणि प्रत्येक प्रभागामध्ये आदर्श मतदान केंद्रे प्रत्येकी दोन केंद्रे असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई असणार आहेत.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये सर्वाधिक उमेदवार
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ येरवडा- कळस-धानोरीमध्ये ४३ उमेदवार रिंगणात उभे आहेत. प्रभाग क्रमांक ३५ मध्ये सर्वात कमी उमेदवार म्हणजे अवघे पाच उमेदवार आहेत.
निवडणूक साहित्याचे वाटप बुधवारी सकाळी होणार
महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी (दि. १४ ) सकाळी १० वाजता निवडणूक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. पीएमपीएमएल बसच्या माध्यमातून हे साहित्य मतदान केंद्रांपर्यंत पाेहचविले जाणार आहे.
मतदानाच्या दिवशी ४५ रुग्णवाहिका
महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे रुग्णवाहिकेसह १५ वैद्यकीय पथके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी पालिकेच्या १५ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयाकडे बूथनिहाय स्टाफ, नर्स आणि आशा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली.
...असे राेखणार दुबार मतदान
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दुबार मतदारांची नावे तब्बल ३ लाख ४४६ आहे. दुबार मतदारांच्या यादीनुसार महापालिकेचेे कर्मचारी संबंधित मतदारांच्या घरी जाऊन तो मतदार इथे मतदान करणार असेल तर अर्ज भरून घेत आहेत. त्या मतदाराचे नाव दुसऱ्या ठिकाणी असल्यास तेथे मतदान केले म्हणून शिक्का मारला जाणार आहे.
एकूण मतदार संख्या ३५ लाख ५१ हजार ८५४
पुरुष : १८ लाख ३२ हजार ४४९
महिला : १७ लाख १९ हजार १७
इतर : ४८८
दुबार मतदार नावे : ३ लाख ४४६