PMC Election 2026 : सकाळी कोणीतरी महिला आली अन् मतदान करून गेली; पुण्यात महिलेच्या नावावर आधीच झाले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:59 IST2026-01-15T12:58:33+5:302026-01-15T12:59:56+5:30
पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग 21 मध्ये मतदान गोंधळ, महिलेच्या नावावर आधीच मत नोंदल्याचा आरोप

PMC Election 2026 : सकाळी कोणीतरी महिला आली अन् मतदान करून गेली; पुण्यात महिलेच्या नावावर आधीच झाले मतदान
पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी तब्बल १,१५३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून पुणेकरांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. मात्र, मतदानाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया (कल्याणी) हायस्कूल मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावावर आधीच मतदान झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
#pmcelection2026#Election : सकाळी कोणीतरी महिला आली अन् मतदान करून गेली; पुण्यात महिलेच्या नावावर आधीच झालेले मतदान #pune#Maharashtra#votingpic.twitter.com/XrsGhWew0o
— Lokmat (@lokmat) January 15, 2026
युवा काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी घटनास्थळीच व्हिडिओद्वारे माहिती देताना सांगितले की, संबंधित महिला मतदानासाठी केंद्रावर गेली असता तिला “तुमच्या नावावर आधीच मतदान झाले आहे” असे सांगण्यात आले. महिलेने याला तीव्र आक्षेप घेतल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, संबंधित महिलेने आपला अनुभव सांगताना म्हटले, मी मतदानासाठी आत गेले असता कर्मचाऱ्यांनी माझे नाव तपासले आणि सांगितले की माझे मत आधीच टाकण्यात आले आहे. मी स्पष्ट सांगितले की मी अजून मतदान केलेले नाही. तरीही मला कागदपत्रे देऊन पुन्हा मतदान करण्यास सांगण्यात आले. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.”
अक्षय जैन यांनी यावेळी मृत मतदारांच्या नावावरही मतदान होत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याचा दावा केला आहे. “प्रशासन एका विशिष्ट पक्षाला मदत करत आहे का?” असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, निवडणूक आयोग आणि प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.