PMC Election 2026: मकरसंक्रातीला ३ हजार थेट खात्यात; एसएमएस पाठवणाऱ्या आमदार टिळेकरांविरुद्ध आयोगाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:40 IST2026-01-12T15:39:24+5:302026-01-12T15:40:27+5:30
PMC Election 2026 लाडक्या बहिणींना मिळणार मकरसंक्रातीची थेट भेट आणि बँक खात्यांमध्ये ३ हजार रुपये थेट जमा. त्यात मतदारांनी कमळाला म्हणजेच भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे संदेशात नमूद करण्यात आले होते

PMC Election 2026: मकरसंक्रातीला ३ हजार थेट खात्यात; एसएमएस पाठवणाऱ्या आमदार टिळेकरांविरुद्ध आयोगाकडे तक्रार
पुणे : सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्याकडून (दि.१०) आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. पैसे देण्याचे आमिष दिल्याने हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याने त्याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.
तक्रारदार यश गजमल यांच्या आईला आमदार टिळेकर यांच्या नावाने एसएमएस पाठवला. ज्यात असे नमूद केले होते की, लाडक्या बहिणींना मिळणार मकरसंक्रातीची थेट भेट आणि बँक खात्यांमध्ये ३ हजार रुपये थेट जमा. त्यात मतदारांनी कमळाला म्हणजेच भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या संदेशात स्पष्टपणे नमूद केले होते की, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजे मकरसंक्रातीला हे रोख हस्तांतरण केले जाईल. तक्रारदार यांच्या म्हण्यानुसार हा संदेश थेट लाभ हस्तांतरणाच्या नावाखाली आर्थिक प्रलोभन देऊन मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो. ही कृती लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ अंतर्गत लाचखोरीची असून, आदर्श आचारसंहितेचे थेट उल्लंघन करणारी आहे.
तक्रारदारांनी निवडणूक आयोगाला विनंती करत या प्रकरणाची तत्काळ चौकशी करावी, उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित आमदार आणि पक्षावर कठोर कारवाई करावी, निवडणुकीच्या हेतूने असे कोणतेही हस्तांतरण केले जाणार नाही, याची खात्री करावी, संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे. तसेच आवश्यक असलेले स्क्रीनशॉट व अतिरिक्त पुरावे आयोगाकडे सादर करू, असेही तक्रारीत नमूद आहे.