PCMC Election Results 2026 : महापालिकेतील चुकीच्या कामांविराेधात ताेंड उघडा..! अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना झापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:16 IST2026-01-21T15:12:57+5:302026-01-21T15:16:59+5:30
महापालिकेची निवडणूक उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रतिष्ठेची केली हाेती. त्यांनी स्वतः उमेदवार ठरविण्यापासून प्रचाराची धुरा सांभाळली.

PCMC Election Results 2026 : महापालिकेतील चुकीच्या कामांविराेधात ताेंड उघडा..! अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना झापले
पिंपरी : महापालिका निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी उमेदवारांचा प्रचार केला नाही. काही जण निवडणूक न लढता मैदानाच्या बाहेर राहिले, हे चुकीचे हाेते, आता तरी ताेंड उघडा, चुकीच्या कामांविराेधात आक्रमकपणे बाेला, असा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त केला.
महापालिकेची निवडणूक उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रतिष्ठेची केली हाेती. त्यांनी स्वतः उमेदवार ठरविण्यापासून प्रचाराची धुरा सांभाळली. महापालिकेतील कारभाराची चिरफाड करत भाजपच्या स्थानिक नेत्यांना ‘टार्गेट’ केले. त्यानंतरही राष्ट्रवादीला अपयश आले. केवळ ३७ नगरसेवक निवडून आले.
पवार यांनी साेमवारी (दि.१९) नवनिर्वाचित ३७ नगरसेवकांची पुण्यात बैठक घेतली. निवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन केले. निवडणुकीचा आढावा घेतला. पराभवाच्या कारणांची चर्चा केली. नगरसेवकांना मार्गदर्शन केले. त्याचबराेबर प्रचारात आजी-माजी आमदारांनी उमेदवारांचा प्रचार केला नाही. आता तरी ताेंड उघडा, चुकीच्या कामाविराेधात बाेला, असे आदेश पवार यांनी नगरसेवकांना दिले. पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्यांचे पवार यांनी कौतुक केले.
तीन प्रभागातील पॅनेल प्रमुखांचे काैतुक
महापालिकेच्या ३२ पैकी फक्त तीन प्रभागांत राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक निवडून आले. त्यात प्रभाग क्रमांक ९, २० आणि २१ या तीन प्रभागांतील उमेदवारांनी एकाेप्याने प्रचार केला. पॅनेल टू पॅनेल मतदान झाले. त्यामुळे या सर्वांचे उपमुख्यमंत्री पवार यांनी काैतुक केले.
विराेधी पक्षनेते पदासाठी आक्रमक चेहरा देणार
राष्ट्रवादीचा गटनेता महापालिकेचा विराेधी पक्षनेता असणार आहे. या पदासाठी प्रभाग क्रमांक २० मधील चारही नगरसेवक निवडून आणणारे पॅनेल प्रमुख संदीप वाघेरे, भाऊसाहेब भाेईर, राहुल भाेसले, माजी महापाैर वैशाली घाेडेकर यांनी विराेधी पक्षनेते पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. चुकीच्या कामांविराेधात बाेलणारा आणि आक्रमक चेहरा विराेधी पक्षनेते पदासाठी देणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
काही पदाधिकाऱ्यांनी प्रचार न केल्यामुळे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. चुकीच्या कामाला विराेध करा, त्याविराेधात आवाज उठवा, असे आदेश दिले. गटनेता निवडीबाबत चर्चा झाली असून लवकरच त्याची निवड केली जाईल. - याेगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार).