PMC Election: इच्छुकांची संख्या २५००; बंडखोरीचे ग्रहण टाळण्यासाठी भाजपची यादी रविवारी जाहीर होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 20:09 IST2025-12-26T20:08:28+5:302025-12-26T20:09:13+5:30
महापालिका निवडणुकीत एका जागेसाठी भाजपसह अन्य पक्षामध्ये चार ते पाच जण इच्छुक असल्याने प्रमुख पक्षामध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे

PMC Election: इच्छुकांची संख्या २५००; बंडखोरीचे ग्रहण टाळण्यासाठी भाजपची यादी रविवारी जाहीर होणार?
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली १०० उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर होणार होती. मात्र अंतर्गत वाद आणि बंडखोरीचे ग्रहण टाळण्यासाठी भाजपची उमेदवारीची यादी लाबंणीवर पडली आहे. येत्या रविवारी किंवा सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती बुधवारपासून सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे यांनी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज घेतले आहेत. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी उमेदवार देतानाच आवश्यक असलेली जुळवाजुळव करण्यात येत आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. सुमारे २ हजार ५०० जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप उमेदवारी यादी उशिरा जाहीर करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह अन्य पक्षामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षांकडून तिकीट मिळाले नाही, तर इतर पक्षांतून तिकीट मिळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकाच पक्षातील काही नगरसेवक एकाच प्रभागात येऊन उमेदवारीचा मोठा पेच निर्माण होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वडगाव शेरी, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती, शिवाजीनगर या मतदारसंघांमध्ये हा पेच निर्माण झाला आहे. प्रमुख पक्षांकडे निवडणुकीसाठी इच्छुकांची वाढती संख्या असल्याने कोणत्या उमेदवारांना तिकीट द्यावे, असा प्रश्न पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे.
बंडखोरी रोखण्यासाठी कस लागणार
महापालिका निवडणुकीत एका जागेसाठी भाजपसह अन्य पक्षामध्ये चार ते पाच जण इच्छुक आहेत. त्यामुळे प्रमुख पक्षामध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही बंडखोरी राेखण्यासाठी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा नेतृत्वाचा कस लागणार आहे.