'तो किती सुसंस्कृत नेता हे आता कळलं असेल', घायवळला शोधायला बालवडकरची मदत घ्या - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:17 IST2026-01-10T18:16:26+5:302026-01-10T18:17:05+5:30
आता लक्षात आला असेल की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल बालवडकर यांचे तिकीट का कापले?

'तो किती सुसंस्कृत नेता हे आता कळलं असेल', घायवळला शोधायला बालवडकरची मदत घ्या - चंद्रकांत पाटील
पुणे : पुण्यातील भाजपचे उमेदवार लहू बालवाडकर यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ सोबतचे व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडिओ सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून या मुद्द्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश घायवळसोबत ज्यांचे फोटो आहेत त्याची घायवळला शोधायला मदत होईल. याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी पाटलांनी केली आहे.
पाटील म्हणाले, अमोल बालवडकर किती सुसंस्कृत नेता आहे. हे आता कळलं असेल. उमेदवाराचे तिकीट पक्षाचं असतं. आता लक्षात आला असेल की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल बालवडकर यांचे तिकीट का कापले. हे सगळे असेल तरीही एवढं तो बोलत आहे. निलेश घायवळसोबत ज्याचे फोटो आहेत त्याची घायवळला शोधायला मदत होईल. त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी माहिती असतात त्यामुळं अनेक बाबी समोर येतात. अमोल बालवडकर याने कितीही आरडा ओरड केला तरी काही नाही. निलेश घायवळ कुठे गेला याचा शोध घेत आहेत. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, घायवळला शोधायला बालवाडकरची मदत घ्या.
भाजपचे प्रभाग क्रमांक ९ चे अधिकृत लहू बालवडकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळ, अमोल बालवडकर दारू पार्टी करत असल्याचं दिसून येत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकर यांच्यावर हल्लाबोल करत जोरदार निशाणा साधला. सुसंस्कृत पुण्याची ओळख ही शांतता, विचारशीलता आणि जबाबदार वर्तनाची आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून नागरिकांना हीच अपेक्षा असते. काल रात्रीपासून सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या एका व्हिडिओच्या संदर्भात एवढेच नमूद करावेसे वाटते की, राजकारणात टीका करणे हा अधिकार असू शकतो; मात्र स्वतःच्या वर्तनातून कोणती मूल्ये जपली जात आहेत, हेही तितकेच महत्त्वाचे असते. संस्कृती ही भाषणातून नव्हे, तर कृतीतून दिसून येते. आज जे लोक इतरांवर नैतिकतेचे धडे देताना दिसतात, त्यांच्या स्वतःच्या कृतींबाबत सार्वजनिक चर्चा होत असेल, तर आत्मपरीक्षण अपेक्षित ठरते. बाणेर–बालेवाडी–सुससारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत परिसरातील नागरिकांना गोंधळ, गदारोळ किंवा अशा दृश्यांपेक्षा शांत, विकासकेंद्रित आणि जबाबदार नेतृत्व हवे आहे. राजकीय मतभेद स्वाभाविक आहेत; मात्र दुटप्पी भूमिका आणि विसंगत वर्तन याला पुण्याची संस्कृती कधीच मान्यता देत नाही. येथील नागरिक सुज्ञ आहेत ते शब्दांपेक्षा कृती पाहून निर्णय घेतात. असे त्यांनी पोस्ट करून सांगितलं आहे.