प्रसिद्ध शहरांसाठीच्या विमानसेवेत पुणे अजूनही ‘उणे’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 06:48 PM2019-12-03T18:48:59+5:302019-12-03T19:14:10+5:30

पुणे विमानतळ अजूनही देशातील अनेक प्रसिद्ध शहरांशी थेट जोडलेले नाही....

No airplane service for famous cities | प्रसिद्ध शहरांसाठीच्या विमानसेवेत पुणे अजूनही ‘उणे’

प्रसिद्ध शहरांसाठीच्या विमानसेवेत पुणे अजूनही ‘उणे’

Next
ठळक मुद्दे गुवाहाटी, सुरत, बडोदा, डेहराडून या शहरांना नाही कनेक्टिव्हिटी150 पुणे विमानतळावर दररोज विमानांची ये-जा होते. 90 विमानांच्या फेºया दररोज रात्री होतात..रात्रीही निर्बंध घातल्याने विमान उड्डाणे व उतरविण्यास मर्यादा

- राजानंद मोरे -

पुणे : मागील काही वर्षांपासून प्रवासी संख्येत वेगाने वाढ होणारे पुणेविमानतळ अजूनही देशातील अनेक प्रसिद्ध शहरांशी थेट जोडलेले नाही. गुवाहाटी, सुरत, बडोदा, पटना, इंदूर, वाराणसी यांसह १५ प्रसिद्ध शहरांमध्ये थेट पुण्यातून विमानसेवा नसल्याने प्रवाशांना मुंबईचाच आधार घ्यावा लागत आहे. हवाई दलाने पुणे विमानतळावरील धावपट्टीच्या वापरावर दिवसाबरोबरच आता रात्रीही निर्बंध घातल्याने विमान उड्डाणे व उतरविण्यास मर्यादा आल्या आहेत. 
देशात प्रवासीसंख्येत वेगाने वाढ होणाऱ्या विमानतळांमध्ये पुण्याचा समावेश आहे. विमानतळावर दररोज १५० हून अधिक विमानांची ये-जा होते. जवळपास २५ हजारांहून अधिक प्रवासी या विमानतळाचा वापर करत आहेत. मागील काही वर्षांपासून विमानतळावरील सोयी-सुविधांमध्ये वाढ केली जात आहे. तसेच देशभरातील काही नवीन शहरांशीही पुण्याला विमानसेवेने जोडले जात आहे. 
मात्र, आता या उड्डाणांवर मर्यादा आल्या आहेत. एखाद्या शहरासाठी नव्याने विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक वेळ (स्लॉट) उपलब्ध होत नाही. पुणे विमानतळ हवाई दलाचे असल्याने अनेक उड्डाणांवर निर्बंध आहेत. सुरुवातीपासून दररोज सकाळी दोन ते अडीच तास विमानांची ये-जा ठप्प असते. आता रात्रीही उड्डाणे व विमाने उतरण्यावर बंधने आली आहेत. 
धावपट्टीच्या अस्तरीकरण (रिकार्पेटिंग)चे काम सुरू असल्याने या मर्यादा घालण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे रात्री साडेदहा ते सहा या वेळेत केवळ पाच उड्डाणे व पाच विमाने उतरू शकतात. दररोज रात्री सुमारे ९० विमानांच्या फेºया होत होत्या. त्यामुळे सुमारे ४० विमाने पुणे विमानतळावर उतरतात. पूर्वी हे प्रमाण जवळपास ५० एवढे होते. 
तसेच जेट एअरवेज कंपनी बंद झाल्याने अद्यापही या कंपनीची मुंबई, इंदूर व सिंगापूर उड्डाणांसाठी कोणतीही विमान कंपनी पुढे आलेली नाही. त्यामुळे हे स्लॉट रिकामे आहेत. हवाई दलाच्या निर्बंधांमुळे पुणे विमानतळ रायपूर, भुवनेश्वर, पटना, इंदूर, वाराणसी, अमृतसर, मंगलुरू, पोर्टब्लेअर, तिरुचिरापल्ली, गुवाहाटी, उदयपूर, सुरत, आगरताळा, बडोदा, डेहराडून आदी मोठ्या शहरांशी थेट जोडलेले नाही. या भागातून पुण्यामध्ये शिक्षण, नोकरी, तसेच व्यवसायासाठी ये-जा करणाºयांची संख्या मोठी आहे. तसेच पर्यटन, धार्मिक, उद्योगाच्यादृष्टीनेही ही शहरे महत्त्वाची आहेत. पण थेट विमानसेवा नसल्याने मुंबई विमानतळाचा वापर अधिक केला जात आहे. 
........
पटना, वाराणसीसह काही शहरांसाठी पुणे विमानतळावरून विमानांचे उड्डाण होत होते. पण ही उड्डाणे रात्रीच्या वेळी असल्याने प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे विमान कंपन्यांनी ही सेवा बंद केली. अनेक प्रवासी रात्रीचा प्रवास करणे टाळत होते. या शहरांमध्ये रात्रीच्या वेळी विमानतळावरून घरापर्यंत जाणे तितकेसे सुरक्षित नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. परिणामी कमी प्रतिसाद मिळत असल्याने विमान कंपन्या पुढे येत नाहीत. अशा शहरांसाठी दिवसा विमानसेवा सुरू झाल्यास चांगला प्रतिसाद मिळेल, अशी 
अपेक्षा विमानतळ प्रशासनाला आहे.
......
या शहरांपासून पुणे दूर...
रायपूर, भुवनेश्वर, पटना, इंदूर, वाराणसी, अमृतसर, मंगलुरू, पोर्टब्लेअर, तिरुचिरापल्ली, गुवाहाटी, उदयपूर, सुरत, आगरताळा, बडोदा, डेहराडून.
........
धावपट्टीच्या अस्तरीकरणाच्या कामामुळे विमानसेवेवर बंधने आली आहेत. पूर्वी दिवसा काही निर्बंध होते, आता रात्रीही ही बंधने घालण्यात आली आहेत. पुणे विमानतळावरून दिवसा जवळपास ५० विमानांचे उड्डाण होते. ही उड्डाणे किमान ६० पर्यंत वाढू शकतात. असे झाल्यास इतर शहरे विमान वाहतुकीद्वारे थेट पुण्याशी जोडणे शक्य होईल. त्यासाठी हवाई दलाला सकाळी ६ ते रात्री १०.३० या वेळेत अधिकचे स्लॉट उपलब्ध करून देण्याची विनंती केली जाणार आहे. हे स्लॉट उपलब्ध झाल्यास विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर होऊ शकेल.- अजय कुमार, संचालक, पुणे विमानतळ
 

Web Title: No airplane service for famous cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.