पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल
By नितीन चौधरी | Updated: April 25, 2024 17:03 IST2024-04-25T17:01:31+5:302024-04-25T17:03:06+5:30
पुणे आणि शिरूर, बारामती लोकसभेच्या रणधुमाळीची राज्यभरात चर्चा सुरु

पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे: पुणे, शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अर्ज भरला. या वेळी मोहोळ यांनी शक्तीप्रदर्शन केले.
मोहोळ यांनी पुणे मतदारसंघातून चार अर्ज भरले. तर त्यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांनी डमी अर्ज भरला. या वेळी मोहोळ यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर उपस्थित होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती जाणवली. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे यांनी हजेरी लावली. अर्ज सादर करण्यापूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी खासदार प्रकाश जावडेकर उपस्थित झाले. मोहोळ यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे अर्ज दाखल केला.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. या वेळी त्याच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप मोहिते, वल्लभ बेनके, चेतन तुपे उपस्थित होते. अर्ज भरण्यापूर्वी पवार आढळराव व तुपे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर काही वेळ चर्चा केली. याच वेळी शिरूरमधील मंगलदास बांदल हेही उपस्थित झाले. बांदल यांनी पवार यांच्याशी या वेळी चर्चाही केली. आढळराव यांनी अर्ज भरल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले येणार अशी चर्चा होती. मात्र, सुमारे दोन तास वाट पाहिल्यानंतर आढळराव यांनी निघून जाणे पसंत केले. दरम्यान मोहोळ यांच्यासोबत आलेल्या नीलम गोऱ्हे यांनी आढळराव यांच्यासोबत हजेरी लावली. आढळराव यांनी शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याकडे दाखल केला.