PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:46 IST2026-01-15T10:44:39+5:302026-01-15T10:46:27+5:30
Pune Municipal Election 2026 voting: प्रभाग ३४ मधील धायरी येथील नारायणराव सणस विद्यालय मतदान केंद्रावर भाजपचा कार्यकर्ता मतदानानंतर काही महिलांच्या बोटांवर लावलेली शाई पुसत होता.

PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना सिंहगड रस्ता परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक ३३, ३४ आणि ३५ मधील अनेक केंद्रांवर मतदानाची शाई लगेच पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याच दरम्यान, धायरीतील एका मतदान केंद्रावर शाई पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रभाग ३४ मधील धायरी येथील नारायणराव सणस विद्यालय मतदान केंद्रावर भाजपचा कार्यकर्ता मतदानानंतर काही महिलांच्या बोटांवर लावलेली शाई पुसत होता. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला. बोगस मतदानासाठीच हा प्रकार केला जात असल्याचा संशय आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडले, तेव्हा भाजपाचे काही कार्यकर्ते तिथे आले आणि त्याला सोडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
बोगस मतदानाची भीती?
केवळ धायरीच नव्हे, तर सिंहगड रस्ता परिसरातील प्रभाग ३३ आणि ३५ मध्येही शाई सहज पुसली जात असल्याच्या तक्रारी मतदारांनी आणि राजकीय पक्षांनी केल्या आहेत. मु्ंबईतूनही बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. निवडणूक आयोगाकडून पुरवण्यात आलेल्या शाईच्या गुणवत्तेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शाई पुसली जात असल्यामुळे एकाच व्यक्तीकडून वारंवार मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती उमेदवारांनी व्यक्त केली आहे.