राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मत देण्यासाठी पुण्याच्या प्रभाग ९ मध्ये पैसे वाटप; तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:50 IST2026-01-10T19:49:30+5:302026-01-10T19:50:38+5:30
एकाच्या दुचाकीच्या डिक्कीत दीड लाख तर दुसऱ्याच्या घराची झडती घेतली असता १ लाख ३ हजार रुपये रोख आढळून आले

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मत देण्यासाठी पुण्याच्या प्रभाग ९ मध्ये पैसे वाटप; तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल
पुणे : पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांना पैसे वाटून प्रलोभन देण्याचा प्रकार उघडकीस आला असून, बाणेरपोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेरपोलिसांना शुक्रवारी (दि.९) सायंकाळी मिळाली की, द ९६ के ऑटो केअर गॅरेज, लक्ष्मीमाता मंदिराजवळ, बालेवाडी येथे काही व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मत देण्यासाठी मतदारांना पैसे वाटत आहेत. त्या ठिकाणी बाणेर पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, संबंधित व्यक्ती मतदारांना पैसे देत असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलिसांनी गणेश सुनील लिंगायत (२४, रा. बालेवाडी) आणि ऋषिकेश भगवान बालवडकर (रा. लक्ष्मी माता मंदिराच्या पुढे, बाणेर- बालेवाडी रोड) आणि गॅरेज मालक रोहित लक्ष्मण उत्तेकर या तिघांवर बाणेर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंगायत याच्या दुचाकीच्या डिक्कीत दीड लाख रुपये रोख तर ऋषिकेश बालवडकर याच्या घराची झडती घेतली असता १ लाख ३ हजार रुपये रोख आढळून आले. ही रक्कम प्रभाग क्र. ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मत देण्यासाठी बालेवाडी परिसरातील मतदारांना वाटप करण्यासाठी आणली असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली. पुढील तपास न्यायालयाची परवानगी घेऊन बाणेर पोलिस करत आहेत.