Maharashtra Election 2019 : हडपसरमध्ये शरद पवार यांचा विचार उभा : डॉ. अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 14:10 IST2019-10-19T14:02:23+5:302019-10-19T14:10:23+5:30
Maharashtra Election 2019 : आलिशान, महागड्या गाडीची हौस असणे चांगले आहे, पण ती स्वकष्टार्जित असावी. कोणाच्या मेहेरबानीने लाभलेली नसावी.

Maharashtra Election 2019 : हडपसरमध्ये शरद पवार यांचा विचार उभा : डॉ. अमोल कोल्हे
हडपसर : हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे-पाटलांच्या रूपाने फक्त उमेदवार उभा नाही, तर शरद पवार यांचा विचार उभा आहे, त्यांच्या विचाराला महाराष्ट्र साद देत असताना हडपसरने मागे राहू नये. येत्या २१ ऑक्टोबर रोजी चेतन तुपेना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या केशवनगर व नंतर कात्रज येथील सभेत डॉ. कोल्हे यांनी जनतेशी संवाद साधला.
डॉ. कोल्हे म्हणाले, आलिशान, महागड्या गाडीची हौस असणे चांगले आहे, पण ती स्वकष्टार्जित असावी. कोणाच्या मेहेरबानीने लाभलेली नसावी. हडपसर विधानसभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चेतन तुपे पाटलांच्या रूपाने सुसंस्कृत व सुशिक्षित चेहरा उमेदवार म्हणून दिला आहे. आबालवृद्धांना, माता-भगिनी, युवांना आपले वाटणारे हे नेतृत्व आहे. हडपसरचा खुंटलेला विकास सामान्यांचा विचार करणारा चेतन तुपे यांच्यासारखा उमदा नेताच करू शकतो.
डॉ. कोल्हे म्हणाले, की भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आमदारांना त्यांची योग्य जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. हडपसरच्या विकासात असलेली बाधा दूर करण्यासाठी आता निकराची लढाई करावी लागणार आहे. हडपसरचा, इथल्या माणसांचा विचार करणारा आमदार जनतेला निवडून द्यावा लागेल. त्यातूनच हडपसरचा खुंटलेला विकास पुन्हा मार्गी लागेल.
......
हडपसरचा आमदार मूठभर बिल्डरांच्या हातातला ‘बाहुला’ नसावा, तर चेतन तुपे पाटलांसारखा जनतेचा विचार करून विकासाभिमुख कामे करणारा असावा. आता जनतेने आपला माणूस विधानसभेला पाठवावा, असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.