महाराष्ट्र निवडणूक २०१९: चंद्रकांत पाटलांनी मनसे उमेदवाराला दिली भाजप प्रवेशाची ऑफर; मात्र किशोर शिंदे म्हणाले की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 17:12 IST2019-10-21T16:59:57+5:302019-10-21T17:12:38+5:30
कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

महाराष्ट्र निवडणूक २०१९: चंद्रकांत पाटलांनी मनसे उमेदवाराला दिली भाजप प्रवेशाची ऑफर; मात्र किशोर शिंदे म्हणाले की...
पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या लढतींमध्ये समाविष्ट असलेल्या कोथरूडमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे प्रतिस्पर्धी उमेदवार किशोर शिंदे यांना चक्क भाजप प्रवेशाची ऑफर दिली आहे. त्यांच्या बोलण्याच्या व्हिडीओही सकाळपासून समाज माध्यमांवर गाजत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे दोघेही मतदारांना आवाहन करत मतदारसंघात कार्यकर्त्यांसह फिरत होते. त्यावेळी समोरासमोर आल्यावर पाटील यांनी शिंदे यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, किशोर तुझ्यासारख्या व्यक्तीची भाजपमध्ये गरज आहे. त्यावर शिंदे यांनी तात्काळ उत्तर दिले की, 'तुमच्या पक्षात कर्तृत्ववान खूप आहेत. तुम्ही आमच्यासोबत युती करा. आम्ही येतो तुमच्यासोबत असेही ते म्हणाले.
दरम्यान, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तर मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
चंद्रकांत पाटील भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून प्रदेशाध्यक्ष आहे. ते आतापर्यंत विधान परिषदेवरच निवडून येत होते. परंतु, जनतेतून निवडून आल्याशिवाय मंत्रिमंडळात 'नो एन्ट्री' या मोदी-शाह स्ट्रॅटर्जीमुळे चंद्रकांत पाटलांना विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागत आहे. त्यानुसार त्यांनी कोथरूड मतदार संघाची निवड केली आहे. कोथरूड मतदार संघातून पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर मतदार संघातील लोकांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर १९८२ पासून १३ वर्षे विद्यार्थी परिषदेचा संघटनमंत्री असताना मी पुण्यात इतक्यावेळा गेलो आहे की, पुणे, कोथरुड मला जितके माहित आहे. तितके कोणालाच माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गेली बारा वर्षे मी पुणे पदवीधरचाच आमदार आहे. तसेच आमदार, महसूलमंत्री, पालकमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अनेकदा पुण्याला जातो. त्यामुळे पुणेकर मला परका समजणार नसल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगतिले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोथरुड मतदारसंघात बाजी कोण मारणार हे स्पष्ट होईल.