बारामतीतील मिरवणुकीत अचानक जय पवार समोर आले; भाच्याला पाहून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 04:06 PM2024-04-21T16:06:31+5:302024-04-21T16:08:58+5:30

Supriya Sule: बारामतीत महावीर जयंतीच्या निमित्ताने आयोजिक मिरवणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघे समोरासमोर आले.

Jay Pawar suddenly appeared in the procession in Baramati What did Supriya Sule say when she saw her niece | बारामतीतील मिरवणुकीत अचानक जय पवार समोर आले; भाच्याला पाहून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

बारामतीतील मिरवणुकीत अचानक जय पवार समोर आले; भाच्याला पाहून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Baramati Lok Sabha ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या रुपाने नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबातही उभी फूट पडली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलांनी कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कुटुंबात आरोप-प्रत्यारोपाचे सत्रही सुरू आहे. अशातच आज बारामतीत महावीर जयंतीच्या निमित्ताने आयोजित मिरवणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि सुप्रिया सुळे या समोरासमोर आल्या. यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाच्याची विचारपूस केल्याचं पाहायला मिळालं.

भगवान महावीर यांचं दर्शन घेताना समोर जय पवार हे असल्याचं लक्षात येताच सुप्रिया सुळे यांनी 'कसे आहात जय?' असं विचारत त्यांची विचारपूस केली. त्यावर जय पवार यांनी उत्तर दिलं आणि आपल्या कार्यकर्त्यांसह ते तिथून निघून गेले.

दरम्यान, महावीर जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीदरम्यान सुप्रिया सुळे यांनी ढोल वाजवून जैन समाजबांधवांच्या उत्साहात भर टाकल्याचंही यावेळी पाहायला मिळालं.

पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष

पवार कुटुंब हे आपल्या एकोप्यासाठी राज्याच्या राजकारणात ओळखलं जात होतं. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये टोकदार संघर्ष सुरू आहे. या फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यातच पवार कुटुंबाचा गड मानला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात कुटुंबातील दोन सदस्ये आमने-सामने असल्याने ही निवडणूक दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे. अशा स्थितीत पक्षसंघटनेवर पकड असलेले अजित पवार बाजी मारणार की आपल्या लोकसंग्रहासाठी ओळखले जाणारे शरद पवार हे सरस ठरणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
 

Web Title: Jay Pawar suddenly appeared in the procession in Baramati What did Supriya Sule say when she saw her niece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.