पुण्यात महायुतीत इनकमिंग सुरुच; उद्धवसेनेच्या २ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:26 IST2025-12-23T15:24:55+5:302025-12-23T15:26:00+5:30
पुण्यातील धायरी, खडकवासला, सिंहगड रोड, पर्वती, वडगाव शेरी या भागातील उमेदवारांना महायुतीत घेऊन आपली ताकद वाढवली आहे

पुण्यात महायुतीत इनकमिंग सुरुच; उद्धवसेनेच्या २ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे : पुण्यात माजी गटनेते आणि शिवसेनेचे पुणे शहरातील दोन प्रमुख नेते यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आमचे मित्र पृथ्वीराज सुतार आणि आमचे दुसरे मित्र संजय भोसले आणि त्यांच्या पत्नी अश्विनी संजय भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सभागृहामध्ये मागच्या काळात आम्ही एकत्र काम केलं असल्याचे घाटे यांनी यावेळी सांगितलं आहे.
पुण्यात महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. मागील आठवड्यात २२ पदाधिकाऱ्यांनी मुंबईत रवींद्र चव्हण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता आज पुन्हा उद्धव ठाकरे गटाचे पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शहरात भाजपाची ताकद वाढली आहे. बऱ्याच भागातून महाविकास आघाडीचे नेते महायुतीत प्रवेश करू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यताही वाढल्या आहेत. पुण्यातील धायरी, खडकवासला, सिंहगड रोड, पर्वती, वडगाव शेरी या भागातील उमेदवारांना महायुतीत घेऊन आपली ताकद वाढवली आहे. तर मध्यवर्ती भागातूनही भाजपचे अनेक उमेदवार लढण्यास इच्छुक असल्याचे दिसते आहे. तसेच ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त उद्या लागणार असल्याचे राऊत यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. त्या अनुषंगाने मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या पुण्यात एकत्रित बैठका सुरु आहेत. या सर्व घडामोडींवरून पुणे महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.