शहराचा वाढता विस्तार पाहता पुणे जिल्ह्यात २ महापालिका करण्याची आवश्यकता - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 20:34 IST2026-01-07T20:33:56+5:302026-01-07T20:34:22+5:30
राज्य सरकारच्या निर्णयानुसार उरुळी, फुरसुंगी या दोन गावांसाठी नगरपरिषद करण्यात आली, मात्र या निर्णयामुळे तेथील नागरिक समाधानी आहेत, असे वाटत नाही

शहराचा वाढता विस्तार पाहता पुणे जिल्ह्यात २ महापालिका करण्याची आवश्यकता - अजित पवार
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढता विस्तार पाहता लोकसंख्या पाहता पुणे जिल्ह्यात दोन नवीन महापालिका होऊ शकतात. हडपसरच्या पुढील भागांचा समावेश करुन नवीन महापालिका तर इकडे चाकण, आळंदी, वाघोलीचा वाढत असलेला भाग लक्षात घेता त्यासाठी एक महापालिका अशा दोन महापालिका करणे आवश्यक आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘अलार्म’ ही धोरणात्मक मोहीम सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. या मोहिमेची माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पुण्यात मेट्रो कॉग्रेसने आणली असे सांगुन अजित पवार म्हणाले, महापालिकेच्या तोंडावर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभाऱ्यांनी केलेल्या कारभाराची पोलखोल करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या दोन्ही महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अनागोंदी कारभार केला आहे. या दोन्ही शहरांमध्ये भेडसावणाऱ्या समस्यांवर तो़डगा काढून येथील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘अलार्म’ ही मोहिम सुरु केली जाणार आहे. ढासळत असलेल्या नागरी पायाभूत सुविधांबद्दल नागरिकांचा वाढता असंतोष ओळखून, ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. पाण्याच्या टँकरपासून ते वाहतुक कोंडीपर्यंत नागरिकांच्या रोजच्या संघर्षावर केंद्रित ही मोहीम असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका झाल्या असून त्यातुलनेत पुणे जिल्ह्यात दोन नवीन महापालिकांची आवश्यकता आहे, असे सांगुन अजित पवार म्हणाले, महापालिकेच्या हद्दीतून वगळून उरुळी, फुरसुंगी या दोन गावांसाठी नगरपरिषद करण्यात आली. राज्य सरकारने हा निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे तेथील नागरिक समाधानी आहेत, असे वाटत नाही. महापालिका करण्याचे ठरल्यास ही दोन गावे देखील महापालिकेत येऊ शकतात.