हाय डेफिनेशन एआय कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, आयपी स्पीकर्स; यंदा गणेशोत्सवात पुणे पोलिसांचा हायटेक बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:05 IST2025-08-18T19:05:17+5:302025-08-18T19:05:50+5:30
तिहेरी सुरक्षा यंत्रणा पोलिसांच्या मदतीसाठी कार्यरत राहणार असल्याने गुन्हेगारांच्या हालचालींवर देखील वचक बसण्यास मदत होणार

हाय डेफिनेशन एआय कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, आयपी स्पीकर्स; यंदा गणेशोत्सवात पुणे पोलिसांचा हायटेक बंदोबस्त
पुणे: शहरातील गणेशोत्सवाची ख्याती भारतासह विदेशात देखील मोठी आहे. दरवर्षी पुण्यातील गणेशोत्सवासाठी परदेशी नागरीक मोठ्या संख्येने शहरात येत असतात. लाखो भाविकांची गर्दी शहरातील गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी दररोज होत असते. त्यासाठी पुणेपोलिस दल देखील आता सज्ज झाले आहे. यंदाचा गणेशोत्सव भक्ती, उत्साह आणि हायटेक सुरक्षेत पार पडणार आहे. लाखो भाविकांच्या गर्दीत शिस्त व शांती राखण्यासाठी पोलिसांकडून हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला जाणार असून, त्यांच्या मदतीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) कॅमेरे, आयपी स्पीकर्स आणि ड्रोन कॅमऱ्यांद्वारे लक्ष अशी तिहेरी सुरक्षा यंत्रणा पोलिसांच्या मदतीसाठी कार्यरत राहणार आहे. यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर देखील वचक बसण्यास मदत होणार आहे.
पुणे पोलिसांकडून याआधी देहू व आळंदी येथून निघणाऱ्या पालखी दरम्यान पहिल्यांदाच एआयच्या मदतीने सहभागी वारकऱ्यांची संख्या मोजली होती. त्याचप्रमाणे गणेशोत्सवादरम्यान शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन, पर्यायी मार्ग, पोलिस बंदोबस्ताचे अचूक नियोजन एआयच्या मदतीने केले जाणार आहे. शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग, मंडळांचे मंडप, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड व गर्दीच्या ठिकाणी २ हजार ८८६ हाय डेफिनेशन एआय कॅमेरे बसवण्यात आले असून, यापूर्वीचे १ हजार ३४१ कॅमेरे अपग्रेड करण्यात आले आहेत. हे कॅमेरे नाईट व्हिजनचे असल्याने त्यामध्ये फेस रिकग्नायझेशन सिस्टीम आणि अॅडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्सचा वापर केला जाणार आहे. पोलिसांकडे असलेल्या गुन्हेगारांच्या डेटाबेसशी थेट लिंक झाल्यामुळे पेहराव बदलल्या नंतरही आरोपींना तातडीने ओळखणे शक्य होणार आहे. याशिवाय शहरात २०० आयपी स्पीकर्स बसवण्यात आले आहेत. अचानक झालेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवणे, तातडीची सूचना देणे किंवा वाहतुकीचे मार्गदर्शन करण्यासाठी हे स्पीकर्स उपयोगी ठरणार आहेत.
ड्रोन द्वारे गस्त...
एआय सुरक्षेसह अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे यंदाच्या गणेशोत्सवात ड्रोनद्वारे गस्त घातली जाणार आहे. गर्दिची ठिकाणे तसेच मिरवणूक मार्गावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. ड्रोन कॅमऱ्यांनी टिपलेले दृश्य थेट पोलिस नियंत्रण कक्षाला मिळणार असून, यामुळे गर्दीत संशयास्पद हालचाली ओळखणे आणखी सोपे होणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्यासह अपर पोलिस आयुक्त, सर्व झोनचे वरिष्ठ उपायुक्त, गुन्हे शाखेचे अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रभारी, त्यांचे अधिकारी यांचे याकडे विशेष लक्ष असणार आहे.