Chandni Chowk Pune: पुण्यात संततधार पाऊस; चांदणी चौकातील पूल पाडणे ढकलले पुढे
By नितीश गोवंडे | Updated: September 16, 2022 15:38 IST2022-09-16T15:37:51+5:302022-09-16T15:38:04+5:30
येत्या १८ सप्टेंबरला हा पूल पाडला जाईल, असे सांगितले जात होते

Chandni Chowk Pune: पुण्यात संततधार पाऊस; चांदणी चौकातील पूल पाडणे ढकलले पुढे
पुणे : पुणेकरांची चांदणी चौकातील वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी एनडीए ते पाषाण हा पूल पाडण्याचे निश्चित झाले आहे. या पुलामुळे मुंबईहून साताऱ्याकडे जाताना आणि साताऱ्याहून मुंबईला जाताना बॉटलनेक होत असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, असा निष्कर्ष काढला आहे. येत्या १८ सप्टेंबरला हा पूल पाडला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र कामांतील विलंब आणि सततच्या पावसामुळे पूल पाडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.
पूल नेमका कधी पाडला जाईल, हे पूल पाडण्याच्या चार दिवस आधी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा केल्यावर सांगण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प प्रमुख संजय कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ही आहेत कारणे
- पूल पाडण्याआधी जी कामे करणे आवश्यक आहेत, त्यासाठी रात्री सात ते आठ तासांचा वेळ मिळेल, असे प्रशासनाला वाटत होते. मात्र रात्री ११ पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते आणि सकाळी सातपासूनच पुन्हा वाहतूक सुरू होते. त्यामुळे काही कामांना विलंब होत आहे.
- पूल पाडण्याच्या दिवशी कोणताही विशेष मेगाब्लॉक नसून पूल पाडल्यानंतर तेथील राडारोडा उचलून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी १० ते १२ तास लागणार असल्याने त्यादरम्यान वाहतूक वळवण्यात येणार आहे.
- नेमकी वाहतूक कोणत्या मार्गाने वळवणार हे येत्या दोन ते तीन दिवसांत निश्चित होईल आणि पूल पाडण्याची नवीन तारीख जाहीर केली जाईल, असेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प प्रमुख संजय कदम यांनी सांगितले.