Pune Ganpati Visarjan: सकाळी १० ते ५ मानाचे गणपती लक्ष्मी रस्ता सोडतच नाहीत; सकाळी सातच्या मिरवणुकीवर १०० मंडळे ठामच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:34 IST2025-08-04T12:34:09+5:302025-08-04T12:34:51+5:30
सकाळी ७ वाजता मिरवणूक सुरू करण्याचा आग्रह केवळ धार्मिक नसून व्यवस्थापनदृष्ट्याही महत्त्वाचा असल्याचे मंडळांचे म्हणणे आहे.

Pune Ganpati Visarjan: सकाळी १० ते ५ मानाचे गणपती लक्ष्मी रस्ता सोडतच नाहीत; सकाळी सातच्या मिरवणुकीवर १०० मंडळे ठामच
पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत १०० हून अधिक गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीची सुरुवात सकाळी ७ वाजताच करावी, या आपल्या भूमिकेवर ठाम राहून प्रशासनासमोर नवा पेच निर्माण केला आहे. त्यामुळे यावर पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्व मंडळांचे लक्ष लागून आहे.
पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक शहराच्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे. सकाळच्या वेळेत सुरू होणाऱ्या मिरवणुका संपूर्ण दिवसभर सुव्यवस्थित पार पडतात, असा पूर्वानुभव मंडळांकडे आहे. त्यामुळे सकाळी ७ वाजता मिरवणूक सुरू करण्याचा आग्रह केवळ धार्मिक नसून व्यवस्थापनदृष्ट्याही महत्त्वाचा असल्याचे मंडळांचे म्हणणे आहे.
पूर्वीपासून जी प्रथा होती म्हणजे पाच-पाच मंडळे सोडली जायची ही प्रथा कधीपासून बंद पडली? ही प्रथा आजही सुरू आहे. ही प्रथा मोडण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. बरे ही प्रथा प्रशासनानेच सुरू केलेली आहे. हा संपूर्ण दबाव प्रशासनावर येणार आहे. मानाचे गणपती सकाळी दहा वाजता मिरवणूक सुरू करतात. प्रत्येक मंडळाच्या पुढे पाच पाच पथके असतात. हे दहा ते पाच या वेळेत ते लक्ष्मी रोडचा ताबा सोडत नाहीत. पाचनंतर समजा दगडूशेठ येतात. त्याच्यानंतर वर्षानुवर्षे गेली अनेक वर्षे लक्ष्मी रोडची पाच मंडळे जातात. शिवाजी रोडची विद्युत रोषणाईचे पाच मंडळे जातात. असे गुणगोविंदाने सगळ्या मंडळांचे एकजुटीने व्यवस्थित सुरू आहे. मात्र आता नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न होतो. यासाठी गणेश मंडळांचा विरोध होत आहे.
मंडळांची भूमिका
- मानाचे पाच गणपती सकाळी लवकर निघाले आणि १२ पर्यंत समाधान चौकात पोहोचले तर मागच्या मंडळांना न्याय मिळेल.
- ३० तास चालणारी मिरवणूक वेळेत पूर्ण होईल.
- मानाच्या गणपती समोरील ढोल पथकांची संख्या मर्यादित करावी जेणेकरून पथके जास्त वेळ लावणार नाहीत.
- मानाच्या गणपतींप्रमाणे इतर मंडळांनाही न्याय मिळायला हवा.
येत्या आठवड्यात महत्त्वाची बैठक
या संदर्भात प्रशासन आणि सार्वजनिक गणेश मंडळांची एक महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत मिरवणुकीच्या वेळेसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच गणेश मंडळे पालकमंत्री अजित पवार यांचीदेखील भेट घेणार असून त्यांना निवेदन दिले जाणार आहे.
१०० मंडळांनी मिळून बैठक घेत सकाळी ७ वाजता निघण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व मंडळे या मतावर ठाम आहेत. त्यानुसार पोलिस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? याकडे मंडळांचे लक्ष लागून आहे. मंडळांनी घेतलेल्या निर्णयामुळे मिरवणुकीचे तास कमी होतील यात शंका नाही. - सुरेश जैन, रामेश्वर चौक तरुण मंडळ ट्रस्ट.
पुण्यात ठरावीक महत्त्वाची मंडळे नाहीत. तसेच ठरावीक मंडळे श्रीमंत आहेत. मात्र, सामान्य मंडळे मोठ्या प्रमाणात खर्च करतात. त्यांना देखील न्याय मिळायला हवा. प्रत्येक मंडळ मध्येच घुसण्याचा निर्णय जाहीर करतात त्यामुळे परंपरा मोडीत काढली जात आहे. - गणेश भोकरे, मुठेश्वर मंडळ
मानाच्या गणपतींची मिरवणूक लवकर केली तर, इतर मंडळांना न्याय मिळेल. हीच मंडळे सकाळी १० वाजता निघतात आणि सायंकाळी ६ वाजवतात. त्यानंतर ठरावीक मंडळे परंपरा मोडीत काढत मध्येच घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर आमचा आक्षेप आहे. - सनी किरवे, जगोबादादा वस्ताद तालीम मंडळ.