महायुतीवरचा माजी उपमहापौरांचा बहिष्कार; रामदास आठवलेंच्या फोननंतरही निर्धार कायम
By राजू इनामदार | Updated: November 13, 2024 19:18 IST2024-11-13T19:16:56+5:302024-11-13T19:18:28+5:30
आरपीयला १२ जागा द्या, या मागणीकडे महायुतीमधील अन्य पक्षांनाही लक्ष दिले नाही

महायुतीवरचा माजी उपमहापौरांचा बहिष्कार; रामदास आठवलेंच्या फोननंतरही निर्धार कायम
पुणे: महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून योग्य सन्मान मिळाला नाही या कारणास्तव महायुतीला मतदान करण्याच्या निर्धारावर माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व बरेच कार्यकर्ते कायम आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी फोनवरून समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तो या निर्धारामुळे अयशस्वी झाला.
डॉ. धेंडे म्हणाले “याआधी व मंगळवारी पुण्यात आल्यानंतरही आठवले यांनी फोन केला. त्यानंतर अशोक कांबळे यांच्याकडून निरोपही देण्यात आला, मात्र माझे मत अजूनही कायम असल्याचे त्यांना सांगितले. युती असेल तर ती सन्मानजनक हवी. आठवले केंद्रीय मंत्री आहेत. ते भाजपच्या नेत्यांकडे वारंवार आरपीआयला किमान १२ जागा तरी द्या म्हणत होते. त्यानंतर त्यांनी जागा कमीही केल्या. पण भाजपने किंवा महायुतीमधील अन्य पक्षांनाही या मागणीकडे लक्ष दिले नाही. जागा वाटपात आठवले यांना सामावून घेतले नाही.
आंबेडकरी विचारांची मते चालतात, मात्र त्यांना सत्तेत वाटा द्यायचा नाही हे बरोबर नाही. त्यामुळे जाणीपूर्वक महायुतीला मतदान करायचे नाही हा निर्णय घेतला आहे. त्याला आंबेडकरी चळवळीतील अनेकांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळेच आमचा निर्धार कायम आहे असे डॉ. धेंडे यांनी सांगितले. निवडणुक झाल्यानंतर आम्ही एकत्रित बसून आमचा निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली.