'३० वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार नको', पुण्यातील इच्छुक नाराज, जुन्या चेहऱ्यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 18:12 IST2024-10-28T18:11:41+5:302024-10-28T18:12:27+5:30
पर्वती, खडकवासला, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा, कोथरूड मतदारसंघात भाजपासमोर तगड्या उमेदवारांचे आव्हान

'३० वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार नको', पुण्यातील इच्छुक नाराज, जुन्या चेहऱ्यांना उमेदवारी
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आले. त्यात पर्वती, खडकवासला, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा, कोथरूड मतदारसंघाचा समावेश आहे. या सहाही मतदारसंघात भाजपने उमेदवारी जुन्या चेहऱ्यांना दिली आहे. त्यामुळे इच्छुक असलेले सर्वच नाराज झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, खडकवासलातून भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर यांनी पराभव केला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने आणि दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक या तिघांनी मतदारसंघातून तयारी सुरू केली होती. या तिघांपैकी एकाला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पुन्हा एकदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हेमंत रासने यांच्यावर विश्वास दाखवित कसबा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नाराज होऊन सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
‘तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय; पण ३० वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय…’ ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. धीरज घाटेंनी उमेदवारी न मिळाल्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झाले आहेत. भिमाले सोमवारी दुपारी चार वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. कोथरूडमधून अमोल बालवडकर हे इच्छुक होते; पण उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत.