'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांवर शेवटचा 'वार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:56 IST2026-01-13T17:54:28+5:302026-01-13T17:56:12+5:30
महापालिकांच्या निवडणुकीचा प्रचार थांबण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर शेवटचा वार केला. अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनांची खिल्ली उडवत फडणवीसांनी टीका केली.

'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांवर शेवटचा 'वार'
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच सामना रंगलेला आहे. अजित पवारांकडून पहिला वार करण्यात आल्यानंतर शेवटचा बाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डागला. अजित पवारांनी महापालिका निवडणुकीत अनेक आश्वासने दिली आहेत, त्यावरून 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांना डिवचले.
प्रचार संपण्यापूर्वी पुण्यात झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मला कुणावर टीका करायची नाहीये, पण काही जणांना आश्वासन देताना आपण कुठून ते पूर्ण करणार, हे माहिती नाही. 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', अशी म्हण पुण्यात आहे", अशा शब्दात फडणवीसांनी अजित पवारांवर हल्ला चढवला.
दादा तयार करण्याची निवडणूक नाही -फडणवीस
"पुण्यात आधुनिकता यावी. पुण्याचे दळणवळण चांगले व्हावे, झोपडपट्टीत राहणारे नागरिक आणि आर्थिक दुर्बलांना जास्तीत जास्त सोयी मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही लोकांना वाटते की, महापालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळात दादा तयार करण्याची निवडणूक आहे. ही गल्लीबोळात दादा तयार करण्याची नव्हे, तर या शहराचे भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे", असे टीकास्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डागले.
"तुम्ही निवडून देणारे नगरसेवक आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीमागे या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खंबीरपणे उभा आहे. जितका निधी लागेल, तितका निधी मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला देईल. पुण्यातील ३२ रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करणार आहोत", असेही फडणवीस म्हणाले.