कर्नाटकमध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली; डॉ. अश्वत्थ नारायण यांचा आरोप
By राजू हिंगे | Updated: November 14, 2024 17:14 IST2024-11-14T17:14:06+5:302024-11-14T17:14:43+5:30
राज्यात विकास ठप्प झाला असून, काँग्रेस सरकारमधील आमदार देखील अस्वस्थ झाले आहेत

कर्नाटकमध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली; डॉ. अश्वत्थ नारायण यांचा आरोप
पुणे : महाराष्ट्रात निवडणूक होत असून, काँग्रेसने वेगवेगळी आश्वासने जनतेला दिली आहेत. पण, गेल्या १८ महिन्यांपासून काँग्रेस सरकार कर्नाटकमध्ये असून, त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती बिघडवली आहे. अनेक भ्रष्टाचार, घोटाळे देखील होताना दिसत आहेत. अवैधरीत्या भूखंड बळकावणे आणि त्यानंतर गवगवा झाल्यावर परत केले जातात. यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील सहभागी आहेत, असा आरोप कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण यांनी पत्रकार परिषदेत केला.
डॉ. अश्वत्थ नारायण म्हणाले, तेलंगणा निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारने ८७ कोटी रुपये बेकायदेशीर हस्तांतरित केल्याची घटना उघडकीस आली आहे. काँग्रेस भ्रष्टाचारात बुडालेले असून, महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारचे पैसे वापरले जात आहेत. राज्यात विकास ठप्प झाला असून, काँग्रेस सरकारमधील आमदार देखील अस्वस्थ झाले आहेत.
तेलंगणात महालक्ष्मी योजनेस काँग्रेसकडून हरताळ : डी.के. अरुणा
तेलंगणामध्ये काँग्रेसने निवडणूक वेळी सहा गॅरंटी जनतेस दिल्या. शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्जमाफी घोषणा केली. शेतकरी आणि कामगार यांना आर्थिक साह्य करू सांगितले. महिलांना दर महिना २५०० रुपये देऊ. अशी महालक्ष्मी योजना सांगितली. प्रत्येक महाविद्यालयीन तरुणीस इलेक्ट्रिक दुचाकी देऊ म्हणाले. बेरोजगार भत्ता देऊ असे सांगितले. पण, कोणत्याही आश्वासनाची पूर्तता सत्तेत आल्यापासून ११ महिन्यांत केली नाही. तरी मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन आश्वासने पूर्ण केल्याचा खोटा प्रचार करत आहे, असे तेलंगणाच्या खासदार डी.के. अरुणा यांनी सांगितले.