Indian Railway | बारामती-लोणंद रेल्वे मार्गासाठी ४० हेक्टरचे सक्तीचे भूसंपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 10:59 IST2022-12-06T10:58:24+5:302022-12-06T10:59:40+5:30
४० हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली...

Indian Railway | बारामती-लोणंद रेल्वे मार्गासाठी ४० हेक्टरचे सक्तीचे भूसंपादन
पुणे :बारामती-फलटण-लोणंद नवीन एकेरी रेल्वे मार्गासाठी आवश्यक १७६ हेक्टर जमिनीपैकी संपादन न झालेल्या ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने संपादन करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. या मार्गासाठी आतापर्यंत १३१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.
पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना जोडणारा रेल्वे प्रकल्प म्हणून बारामती-फलटण-लोणंद या ६३.६५ किमी लांबीच्या रेल्वे प्रकल्पासाठी फलटण, बारामती या तालुक्यांतून भूसंपादन करण्यात येत आहे. यापैकी ३७.२० किमी रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो. या प्रकल्पासाठी बारामती तालुक्यातील काही गावांमधील खासगी जागा संपादित करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या मार्गासाठी १७६ हेक्टर एवढी जागा संपादित करणे आवश्यक आहे. त्यापैकी १२१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. तर काही दिवसांत ९.६८ हेक्टरएवढी जमीन खरेदी करण्यात येईल. त्यामुळे १३१ हेक्टर जमीन संपादित झाली आहे. मात्र, ४० हेक्टर क्षेत्र संपादन करण्यासाठी तेथील नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे ही जमीन सक्तीने संपादन करावी लागणार आहे.
त्यासाठी बारामती प्रांताधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला सक्तीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासाठी त्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. या तालुक्यातील सुमारे साडेसात हेक्टर जमीन ही वनविभागाची आहे. ती संपादन करण्यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली आहे.
बारामती-फलटण-लोणंद रेल्वे प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून गेल्या तीन महिन्यांत १३१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण करण्यात आले आहे. मात्र उर्वरित ४० हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे सक्तीचे संपादन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी