राज्याचे लक्ष लागलेल्या 'बारामती'त उमेदवार वाढले, तब्बल ९ हजार ५८ ईव्हीएमवर मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:55 AM2024-04-25T10:55:23+5:302024-04-25T10:56:11+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होत आहे....

Candidates increased in 'Baramati' which caught the attention of the state, as many as 9 thousand 58 EVMs | राज्याचे लक्ष लागलेल्या 'बारामती'त उमेदवार वाढले, तब्बल ९ हजार ५८ ईव्हीएमवर मतदान

राज्याचे लक्ष लागलेल्या 'बारामती'त उमेदवार वाढले, तब्बल ९ हजार ५८ ईव्हीएमवर मतदान

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या ३८ उमेदवार रिंगणात उरल्याने तीन मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर करावा लागणार आहे. त्यामुळे अतिरिक्त ५ हजार ४८९ यंत्रे देण्यात आली आहेत. या मतदारसंघांत २ हजार ५१६ मतदान केंद्रे असून प्रत्यक्ष ७ हजार ५४८ इतकी यंत्रे लागणार आहेत. त्यात २० टक्के अतिरिक्त यंत्रे देण्यात येणार असल्याने एकूण ९ हजार ५८ इतके यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघामध्ये ३८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारांची संख्या १६पेक्षा जास्त राहिल्याने मतदान यंत्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. यापूर्वी झालेल्या मतदान यंत्रांच्या सरमिसळ प्रक्रियेत एकच यंत्र लागेल, असे गृहीत धरून मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, बारामती मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढल्याने आता तीन यंत्रे लागणार आहेत. पहिल्या दोन यंत्रांत प्रत्येकी १६ उमेदवार तसेच तिसऱ्या यंत्रात उर्वरित सहा उमेदवार आणि एक नोटा अशी सात बटणे असणार आहेत. जिल्हा प्रशासनाने बारामती लोकसभा मतदारसंघाला सुरुवातीला ३ हजार ५६९ इतकी यंत्रे दिली होती. मात्र, जादा उमेदवारांमुळे ५ हजार ४८९ इतकी अतिरिक्त मशिन यंत्रे बारामती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली आहेत. त्यामुळे आता एकूण ९ हजार ५८ इतकी यंत्रे उपलब्ध झाली आहेत.

जिल्हा प्रशासनाकडे २१ हजार २०२ इतकी मतदान यंत्रे होती. त्यांपैकी चारही लोकसभा मतदारसंघांना एक यंत्र याप्रमाणे सुमारे ११ हजार ८९८ इतकी यंत्रे देण्यात आली आहेत. त्यांतील ९ हजार ३०४ इतकी यंत्रे शिल्लक होती. त्यांपैकी पाच हजार ४८९ इतकी अतिरिक्त यंत्रे बारामती मतदारसंघासाठी देण्यात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे आता ३ हजार ८१५ इतकी यंत्रे शिल्लक राहिली आहेत. आतापर्यंत पुण्यासाठी २ हजार ८७०, मावळसाठी १ हजार ९०० तसेच शिरूरसाठी ३ हजार ५५९ इतकी यंत्रे वितरित करण्यात आली आहेत. अतिरिक्त मशिन लागण्याची गरज पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करावी लागण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली.

मतदानासाठी १२ हजार कर्मचारी

बारामती लोकसभा मतदारसंघात २ हजार ५१६ मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी १० हजार ६४ कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मात्र अतिरिक्त २० टक्के कर्मचारी गृहीत धरता सुमारे १२ हजार ७६३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत; तर प्रत्यक्ष उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या १३ हजार ९२३ इतकी आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्ती देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.

Web Title: Candidates increased in 'Baramati' which caught the attention of the state, as many as 9 thousand 58 EVMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.