गर्दीतून एकाने चिठ्ठी दिली अन् ती वाचताच शरद पवारांनी अजितदादांना दिला इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 05:18 PM2024-04-08T17:18:41+5:302024-04-08T17:22:15+5:30

Baramati Lok Sabha: शरद पवार यांचा बारामती आणि आसपासच्या तालुक्यांमध्ये झंझावाती प्रचारदौरा सुरू असून आज त्यांनी अजित पवारांचं नाव न घेता जोरदार टीका केली.

Baramati Lok Sabha ncp Sharad Pawar warned Ajit pawar in supe public meeting | गर्दीतून एकाने चिठ्ठी दिली अन् ती वाचताच शरद पवारांनी अजितदादांना दिला इशारा!

गर्दीतून एकाने चिठ्ठी दिली अन् ती वाचताच शरद पवारांनी अजितदादांना दिला इशारा!

Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मागील तीन दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीसोबत जात वेगळी भूमिका घेतली असून पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरवल्याने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून बारामती आणि आसपासच्या तालुक्यांमध्ये झंझावाती प्रचारदौरा सुरू आहे. सुळे यांच्या प्रचारासाठी आज बारामती तालुक्यातील सुपे येथे शरद पवारांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांना आव्हान दिल्याचंही पाहायला मिळालं.

सुपे इथं नागरिकांशी संवाद साधल्यानंतर शरद पवार निघाले होते. मात्र तितक्यात त्यांना एक चिठ्ठी देण्यात आली. ती चिठ्ठी वाचताच शरद पवारांनी म्हटलं की, "माझ्याकडे देण्यात आलेल्या या चिठ्ठीत लिहिलंय की, 'तुम्हाला जर जनाई योजनेचं पाणी हवं असेल तर घडाळ्यालाच मतदान करावं लागेल, असं लोकांना सांगण्यात आलंय. कारखान्याने तुमचा ऊस न्यायचा असेल तर घडाळ्यालाच मतदान देण्याचा दबाव टाकण्यात येत आहे.' मात्र मी तुम्हाला सांगतो, असा कोणताही दबाव टाकण्यात आला तरी तुम्ही घाबरू नका. असे दबाव टाकणाऱ्यांना माहीत नसावं की त्यांना त्या जागेवर कुणी बसवलं आहे. त्यांना तिथं बसवणाराही मीच आहे. त्यामुळे तुम्ही कसलीही चिंता करू नका," अशा शब्दांत शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना इशारा देत स्थानिक नागरिकांना आश्वस्त केलं.

दरम्यान, शरद पवार यांनी आज जिरायती भागातील विविध गावांचा दौरा केला. यावेळी उंडवडी क.प. येथे आयोजित सभेत पवार यांनी मोदींसह अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. विधानसभेला बारामतीकरांनी राष्ट्रवादीला मते दिली. मात्र ज्यांना निवडून दिलं त्यांनी निवडलेला रस्ता चुकीचा असल्याचे सांगत पवार यांनी सांगत अजित पवार यांना चिमटे काढले. "गेल्या १० ,२० वर्षात बारामतीत स्थानिक राजकारणात लक्ष दिलं नाही. चांगलं काम करा, अडचण आल्यास सांगा, अशी भूमिका मी घेतली. मात्र, काहींनी टोकाची भूमिका घेतली. भाजप हा सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक करणारा पक्ष नाही. बारामतीकरांनी त्यांच्याबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत," असा हल्लाबोलही शरद पवारांनी केला.

दरम्यान, बारामतीत प्रथमच पवार विरुद्ध पवार अशी राजकीय लढाई रंगत असल्याने या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी कंबर कसली असून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. या राजकीय सामन्यात कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: Baramati Lok Sabha ncp Sharad Pawar warned Ajit pawar in supe public meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.