...तर मी अजित पवारांच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार; कल्याणी कोमकरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:43 IST2025-12-29T12:42:16+5:302025-12-29T12:43:15+5:30
आंदेकर कुटुंबातील तिघांनी मुद्दाम अर्ज अर्धवट भरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदेकर कुटुंबातील कोणालाही तिकीट देऊ नये

...तर मी अजित पवारांच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार; कल्याणी कोमकरांचा इशारा
पुणे : खून प्रकरणी तुरुगांत असलेले बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर व सोनाली आंदेकर हे तिघे जण पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आले होते. हे चुकीचे असून, त्याबाबत मी न्यायालयात जाणार आहे. न्यायालयाने या तीन आरोपींना अर्ज भरण्याची परवानगी द्यायला नको होती. त्या तिघांनी मुद्दाम अर्ज अर्धवट भरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदेकर कुटुंबातील कोणालाही तिकीट देऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी त्या तिघांना उमेदवारी दिली, तर मी त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करीन, असा इशारा बंडू आंदेकर यांची मुलगी आणि आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी दिला आहे.
पुण्यातील नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटाचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गुंड बंडू आंदेकर यांनी त्याच्या साथीदारामार्फत नातू आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून केला असल्याचा आरोप कल्याणी कोमकर यांनी केला होता. त्या प्रकरणी बंडू आंदेकरसह १३ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यातच पालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर व सोनाली आंदेकर यांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाची न्यायालयाने दखल घेऊन, तीन आरोपींना काही अटी घालून निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर व सोनाली आंदेकर हे तिघे जण पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आले होते. या सर्व पाश्वभूमीवर बंडू आंदेकर यांची मुलगी आणि आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
कल्याणी कोमकर म्हणाल्या, माझ्या मुलाचा काहीही दोष नसताना आंदेकर टोळीने खून केला आहे. मी आजही मुलाच्या न्यायासाठी लढत आहे. वनराज आंदेकर माझा भाऊ होता. मी माझ्या भावाची सुपारी का देऊ, आम्ही असे काही केले नसूनदेखील आम्ही त्रास भोगत आहोत. माझ्या मुलांचा कोणाशी वाद नव्हता. तरीदेखील आयुषचा आंदेकर टोळीने खून केला आहे. त्या प्रकरणातील सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी असून न्यायालय नक्कीच त्यांना शिक्षा देईल. पालिकेची निवडणूक होत आहे. बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर व सोनाली आंदेकर हे तिघे जण ही निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी काल अर्ज दाखल केला होता. बंडू आंदेकर तो अर्ज दाखल करतेवेळी घोषणाबाजी करीत आले. हे चुकीचे असून, त्याबाबत मी न्यायालयात जाणार आहे. तसेच या तिन्ही आरोपींना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदेकर कुटंबातील कोणालाही तिकीट देऊ नये. जर अजित पवार यांनी त्या तिघांना उमेदवारी दिली, तर मी त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करीन असा इशारा दिला आहे.’’