दुपारची वेळ अन् पुण्यात मतदान थंडावले! शिरूरमध्ये मात्र दोन तासांत १६ टक्के मतदान
By नितीन चौधरी | Updated: May 13, 2024 16:22 IST2024-05-13T16:21:34+5:302024-05-13T16:22:20+5:30
तिन्ही लोकसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वात कमी मतदान पुण्यात ३३.०७ टक्के इतके झाले असून शिरूर व मावळ मध्ये प्रत्येकी ३६.५४ व ३६.४३ टक्के मतदान झाले आहे....

दुपारची वेळ अन् पुण्यात मतदान थंडावले! शिरूरमध्ये मात्र दोन तासांत १६ टक्के मतदान
पुणे :पुणे, मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदानाच्या चौथ्या टप्प्यात मतदानाचा वेग काहीसा मंदावल्याचे असल्याचे चित्र आहे. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघात या दोन तासांच्या टप्प्यात सुमारे १६ टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तिन्ही लोकसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वात कमी मतदान पुण्यात ३३.०७ टक्के इतके झाले असून शिरूर व मावळ मध्ये प्रत्येकी ३६.५४ व ३६.४३ टक्के मतदान झाले आहे.
शहरी भाग असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात अपेक्षेनुसार दुपारच्या टप्प्यात मतदानाला प्रतिसाद कमी मिळाल्याचे चित्र बहुतांश मतदान केंद्रांवर दिसून आले आहे. कसबा पेठ मतदारसंघात एक ते तीन यादरम्यान केवळ ४ टक्के मतदान झाले आहे, तर कोथरूड विधानसभा मतदारसंघात याच टप्प्यात ८ टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वडगाव शेरीत ५ टक्के शिवाजीनगरमध्ये ३ टक्के तर पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात ८ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हडपसरमध्ये एक ते तीन या दोन तासांच्या टप्प्यात ८ टक्के मतदान झाले आहे. तर, भोसरी विधानसभा मतदारसंघात याच काळात ७ टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात या दोन तासांच्या टप्प्यात सुमारे १३ टक्के मतदान झाले असून जुन्नरमध्ये देखील सुमारे ११ टक्के मतदान झाले आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात ११ टक्के तर शिरूर विधानसभा मतदारसंघात १० टक्के मतदान झाले आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने शहरी भागात मतदानाला आता कमी प्रतिसाद दिसत असल्याचे चित्र आहे मतदानाचे शेवटचे दोन तास शिल्लक राहिले असून त्यात नेमके किती मतदान होते, यावर निकालाचे चित्र अवलंबून असेल.