विधानसभेला दारुण पराभव! राजकीय भविष्याने मनसेचे कार्यकर्ते चिंतीत, महापालिका कशी लढायची?

By राजू इनामदार | Updated: December 6, 2024 16:05 IST2024-12-06T16:04:56+5:302024-12-06T16:05:58+5:30

कार्यकर्त्यांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी आत्ताच काही वेगळा निर्णय घ्यायचा का, या विचारात काहीजण असल्याची चर्चा आहे

a terrible defeat to the maharashtra legislative assembly mns activists are worried about the political future how should the municipality fight | विधानसभेला दारुण पराभव! राजकीय भविष्याने मनसेचे कार्यकर्ते चिंतीत, महापालिका कशी लढायची?

विधानसभेला दारुण पराभव! राजकीय भविष्याने मनसेचे कार्यकर्ते चिंतीत, महापालिका कशी लढायची?

पुणे : पक्षाला कसलेच राजकीय भवितव्य काहीच दिसत नसल्याने पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातीलही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व त्यांचे समर्थक कार्यकर्ते चिंतीत झालेले दिसत आहेत. पक्षाच्या विधानसभा निवडणुकीत बसलेला दारूण पराभवाचा धक्का त्यांच्यात अजून कायम असून महापालिका निवडणुकीसाठी आत्ताच काही वेगळा निर्णय घ्यायचा का, या विचारात काहीजण असल्याची चर्चा आहे.

निवडणूक लढवण्याला प्रतिसाद

मागील काही वर्षे मनसे प्रत्येक निवडणुकीत तटस्थच राहिली. लोकसभा निवडणुकीत कधी भाजपला पाठिंबा दिला तर कधी भाजपचा तीव्र विरोध केला. विधानसभेला मोजक्याच जागा लढल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून बहुसंख्य राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्ते काम करतात. मनसे त्याला अपवाद नाही, मात्र तटस्थतेच्या धोरणामुळे मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांची राजकीय ताकद तपासून पाहण्याची संधीच मिळत नव्हती. २०२४ च्या विधानसभेने त्यांना ती संधी दिली. त्यामुळेच विधानसभा स्वबळावर लढवण्याच्या पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयाला पक्षाच्या स्थानिक स्तरातून मोठा पाठिंबा मिळाला.

सभांना गर्दी, मतांना नाही

तब्बल १३६ जागांवर मनसेने उमेदवार उभे केले. खुद्द राज यांचा मुलगा अमीत यालाही मुंबईतून उमेदवारी देण्यात आली. राज यांनी ठिकठिकाणी आपल्या उमेदवारांकरता जाहीर सभा घेतल्या, त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला, मात्र तो मतपेटीत उतरला नाही. सर्वच्या सर्व जागांवर मनसेचे दारूण पराभव झाला. अमीत ठाकरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पुणे जिल्ह्यात मनसेने ७ ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यात पुणे शहरात ४ ठिकाणी तर ग्रामीण भागात ३ ठिकाणी उमेदवार होते. या ७ ही ठिकाणी पराभव झाला. खडकवासला, हडपसर वगळता अन्य मतदारसंघातील उमेदवारांना तर लक्षणीय मतेही मिळाली नाहीत.

कार्यकर्त्यांमध्ये चलबीचल

त्यामुळेच आता जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चलबीचल सुरू झाली आहे. निवडणूक निकालानंतर राज यांनी पुण्यात येऊन मुंबई, ठाणे वगळता अन्य ठिकाणच्या जवळपास ८२ पराभूत उमेदवारांची भेट घेतली. त्यांना दिलासा दिला. मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. राज्यात नवे सरकार स्थापन झाले. त्यांच्याकडून लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक घेण्यात निर्माण झालेली कायदेशीर अडचण दूर केली जाईल असे दिसते. महायुती व महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकांच्या तयारीलाही लागले आहेत. मनसेत मात्र अशी काहीच हालचाल दिसून येत नाही.

थांबायचे की जायचे?

महापालिका निवडणुकीसाठी मनसेतच थांबायचे की दुसरी वाट शोधायची याच्या विचारात बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे. मनसेच्या स्थापनेपासून आम्ही काम करतो. राजकीय लक्ष्य ठेवलेले असतेच, सत्तेशिवाय ध्येय कसे साध्य करता येईल? मात्र आता सत्ता मिळण्याची किंवा सत्तेत सहभाग मिळेल अशी शक्यता मावळलेली दिसते आहे असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राज ठाकरे यांचा करिष्मा आहेच, पण धोरणांमध्ये सातत्य नसणे, सत्तेला पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबाबत स्पष्टता नसणे, विरोध कोणाला? कशासाठी? किती काळ? या प्रश्नांची उत्तरेच कधी मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत ‘थांबायचे की आत्ताच रस्ता बदलायचा?’ अशा मनस्थितीत मनसेचे बहुसंख्य कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे.

कोणताही पक्ष एखाद्या राजकीय पराभवाने लहान किंवा मोठा होत नाही. आमचे नेते राज ठाकरे यांची ध्येय, धोरणे ठाम आहेत, त्यावर होणारी टीका अनाठायी आहे. मतदारांना आज ना उद्या आमची भूमिका नक्की पटेल याचा विश्वास आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कसलीही चलबीचल नाही. आम्ही पुन्हा नव्याने मैदानात उतरू.- बाबू वागसकर- नेते, मनसे

Web Title: a terrible defeat to the maharashtra legislative assembly mns activists are worried about the political future how should the municipality fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.