Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:05 IST2024-10-25T18:05:10+5:302024-10-25T18:05:10+5:30
Andheri east assembly election 2024: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. पण, महायुतीने त्यातून माघार घेतली होती.

Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
-मनोहर कुंभेजकर
Andheri east Maharashtra assembly election 2024: मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार म्हणून विद्यमान आमदार ऋतुजा लटके यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले. तर महायुतीत ही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची असून, पण ती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार की भाजपला? याकडे राजकीय वर्तुळाचे आणि येथील मतदारांचे लक्ष लागले आहे. ही जागा आपल्याला मिळावी यासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपाने आपली ताकद पणाला लावली आहे.
शिवसेनेचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर ऋतुजा लटके विजयी झाल्या होत्या. विशेष म्हणजे मशाल चिन्हावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या आमदार आहेत.
प्रदीप शर्मांच्या पत्नी कृतिका शर्मा इच्छुक
या मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी कृतिका शर्मा या इच्छुक आहेत. तशी पी.एस.फाउंडेशनच्या माध्यमातून गणोत्सवापासून शर्मा पती पत्नींनी हा मतदार संघ पिंजून काढत मोठ्या प्रमाणात मतदारसंघात बॅनरबाजी देखिल केली होती. कृतिका शर्मा या जरी येथून इच्छुक असल्या तरी त्यांचा तसा राजकारणात अनुभव नाही.
ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल उमेदवार असणार?
ही जागा शिंदेंच्या शिवसेनेची असली तरी भाजपाला ही जागा मिळावी, यासाठी भाजपाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे. राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी ही जागा महत्वाची असून, काका या नावाने अंधेरी पूर्व भागात परिचित असलेले मुरजी पटेल हे येथील भाजपचे उमेदवार असतील आणि त्यांच्या नावाची लवकर घोषणा होईल, असा दावा भाजपाच्या येथील एका नेत्याने केला.