lok sabha election gujarat bjp mla says modi govt fitted cctv in polling booths if less votes to bjp | मोदींनी कॅमेरे लावलेत, भाजपाला मत न दिल्यास काम मिळणार नाही; भाजपा आमदाराची धमकी
मोदींनी कॅमेरे लावलेत, भाजपाला मत न दिल्यास काम मिळणार नाही; भाजपा आमदाराची धमकी

गांधीनगर: वादग्रस्त विधानांवरुन निवडणूक आयोग कारवाई करत असतानाही वाचाळवीर नेते तोंडाला लगाम घालताना दिसत नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजपाटी पार्टीचे नेते आझम खान, भाजपाच्या खासदार मेनका गांधी यांच्यावर आयोगानं कारवाई केली आहे. मात्र तरीही प्रचारादरम्यान नेते मंडळी आचारसंहितेचं सर्रास उल्लंघन करत आहेत. 
गुजरातमधल्या दाहोदमध्येभाजपाचे आमदार रमेश कटारा यांनी जनसभेला संबोधित करताना उपस्थितांना थेट धमकीच दिली.
'ईव्हीएमवर जसवंत भाभोर (दाहोद लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार) यांचा फोटो असेल. त्यासमोर कमळाचं चिन्ह असेल. ते पाहूनच बटण दाबा. कोणतीही चूक होऊ देऊ नका. कारण यावेळी मोदी साहेबांनी मतदान केंद्रांवर कॅमेरे लावले आहेत. तुम्ही भाजपाच्या ऐवजी काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्यास ते कॅमेऱ्यात दिसेल आणि कोण कोण काँग्रेसी आहे ते कळेल. मोदी साहेब तुमचा फोटो पाहतील आणि मग तुम्हाला काम मिळणं बंद होईल,' असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला. कटारा हे गुजरातच्या विधानसभेत फतेहपुरा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. 
सर्वोच्च न्यायालयानं वाचाळ नेत्यांवर कारवाई होत नसल्यानं निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. त्यानंतर निवडणूक आयोगानं वाचाळवीरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. वादग्रस्त विधानं केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजपाटी पार्टीचे नेते आझम खान यांना 72 तास प्रचारापासून लांब राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, भाजपाच्या खासदार मेनका गांधी यांना 48 तास प्रचार न करण्याचे आदेश दिले आहेत. 


Web Title: lok sabha election gujarat bjp mla says modi govt fitted cctv in polling booths if less votes to bjp
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.